आचरा : मालवण तालुक्यातील बुधवळे (मळेशेतवाडी) परिसरात गवे व वानरांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. भातशेती, माडबागायती, काजू, आंबा तसेच इतर फळबागांमध्ये वन्यप्राण्यांकडून सातत्याने नुकसान होत आहे. याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत बुधवार, ५ ऑगस्ट रोजी जिल्हा उपवनसंरक्षक मिलिश शर्मा व सहा.वनसंरक्षक (वन्यजीव) डॉ. सुनील लाड, वनक्षेत्रपाल चेतन पाटील यां बुधवळे-मळेशेतवाडी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी विठ्ठल मंदिर, बुधवळे येथे पंचक्रोशीतील शेतकरी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांसमवेत बैठक घेण्यात आली. या बैठकीत वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या शेती व माडबागायतीच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. नुकसानभरपाईसाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया व शासनाच्या योजनांची माहिती देत पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन उपवनसंरक्षक शर्मा यांनी दिले.
वनक्षेत्रपाल चेतन पाटील यांनी वन्यजीव संरक्षणासोबतच मानवी सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगितले. वन्यप्राण्यांपासून बचावासाठी घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांना कोणतीही घटना घडल्यास तातडीने वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. वन विभागाने त्वरित दखल घेत प्रत्यक्ष पाहणी व मार्गदर्शन केल्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्ते समीर मुणगेकर यांनी वनविभागाचे आभार मानले.
वनक्षेत्रपाल चेतन पाटील, सरपंच पानवलकर, सामाजिक कार्यकर्ते समीर मुणगेकर, वनपाल सदानंद परब, वनरक्षक अतुल खोत, लक्ष्मण आमले, आरआरटी पथकाचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य तसेच परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.