सावंतवाडी : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची सोय करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या जाहीर केल्या जात असल्या तरी, पश्चिम रेल्वेने आपल्या बहुतांश गाड्या केवळ रत्नागिरीपर्यंतच मर्यादित ठेवल्याने दक्षिण रत्नागिरी, तळकोकण आणि सिंधुदुर्गातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकात अतिरिक्त प्लॅटफॉर्म, लूप लाईन आणि क्विक वॉटरिंग सिस्टीम यांसारख्या आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे कारण सांगत या गाड्या पुढे विस्तारित केल्या जात नसल्याचा आरोप कोकणवासीयांनी केला आहे.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि सावंतवाडी टर्मिनस प्रकल्पाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण व्हावे, यासाठी आता कोकणवासीयांनी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे (PMO) ऑनलाईन तक्रार नोंदवण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. सावंतवाडी स्थानकात प्लॅटफॉर्म क्र.४ व ५ चे बांधकाम, लूप लाईन तसेच तिलारी धरणातून पाणीपुरवठा करून चिपळूणच्या धर्तीवर क्विक वॉटरिंग सिस्टीम बसवण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली जात आहे. गणेशोत्सवातील तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठीही यात कठोर उपायांची मागणी करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेकडून मुंबई-मडगाव दरम्यान ४ विशेष गाड्या
दुसऱ्या बाजूला मध्य रेल्वेने आठवड्याच्या अखेरीस प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय म्हणून मुंबई आणि मडगाव दरम्यान ४ साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०१०२९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १३ आणि १५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री ००.२५ वा. सुटून दु. १५.१५ वा. मडगाव येथे पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०१०३० मडगाव येथून १३ आणि १५ ऑगस्ट रोजी सायं ४ वा. सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ०३.४५ वा.मुंबईत पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी यांसारखे महत्त्वाचे थांबे देण्यात आले आहेत. गाडी क्रमांक ०१०२९ चे आरक्षण ८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.