देवगड ः देवगड- जामसंडे शहराला पाणीपुरवठा करणार्या दहिबाव पूरक नळयोजनेची पाईपलाईन चार ठिकाणी फुटल्याने ऐन दिवाळी सणात नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागलेे. रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत पाईपलाईनचे दुरुस्तीचे काम सुरू होते.
देवगड-जामसंडे शहराला दहिबाव पूरक नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, या नळ योजनेची पाईपलाईन जीर्ण झाल्याने या पाईपलाईनला वारंवार गळती लागते. रविवारी चार ठिकाणी पाईपलाईन फुटल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद करण्यात आला. खाकशी गाव, खाकशी तिठा व इळये-पाटथर येथील भिडे स्टॉपनजीक दहिबाव नळयोजनेची पाईपलाईन फुटली असून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले आहे. ही बाब नळयोजनेवरील कर्मचार्यांच्या लक्षात येताच तात्काळ पाणी पुरवठा थांबविण्यात आला. जामसंडे शहरातील काही भागात सकाळच्या सत्रात पाणी पुरवठा करण्यात आला. मात्र, दुपारपासून पाणी पुरवठा बंद ठेवून पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. हे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. त्यामुळे ऐन दिवाळी सणात शहरातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागले.