कणकवली : कुडाळातील सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वागत स्वीकारतानाचे फोटो पत्रकार परिषदेत दाखविताना विनायक राऊत. सोबत सतीश सावंत, सुशांत नाईक, कन्हैया पारकर, निलम पालव, उत्तम लोके आदी. pudhari photo
सिंधुदुर्ग

देश दु:खात असताना उपमुख्यमंत्री शिंदेंकडून असंवेदनशीलपणा!

माजी खा.विनायक राऊत यांचे टीकास्त्र ; न्यायालयाचा आदेश उल्लंघनप्रकरणी एसपींकडे तक्रार

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : काश्मिरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पाकिस्तानविरोधात लढण्यासाठी सर्वपक्षीयांनी आम्ही केंद्र शासनासोबत असल्याची ग्वाही पंतप्रधानांना दिली. या घटनेने देश दु:खात असताना महाराष्ट्राचे जबाबदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुडाळात जल्लोष सभा घेत हारतुरे स्वीकारले, फटाक्यांची आतषबाजी केली. एकीकडेते पहलगाममध्ये अडकलेल्या पर्यटकांना दिलासा देण्यासाठी जातात तर दुसरीकडे स्वत:चा टेंभा मिरविण्यासाठी श्रीनगर ते गोवा-कुडाळ प्रवास करत आल्याचे सांगत स्वत:चे गुणगान गातात. त्यांच्या या असंवेनदशील वृत्तीला काय म्हणावे? अशा शब्दात ठाकरे शिवसेनेचे नेते आणि माजी खा. विनायक राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

कणकवली शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडीप्रमुख नीलम पालव, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके आदी उपस्थित होते. विनायक राऊत म्हणाले, पहलगाम हल्ल्यामुळे अख्खा देश चिंतेत,दु:खात बुडालेला असताना तसेच महाराष्ट्रातील काही पर्यटकांचा मृत्यू झाल्याने त्यांचे नातेवाईक आक्रोश करत असताना राज्याचे नेतृत्व करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुडाळात सभेत हारतुरे स्वीकारून आणि जल्लोष करून जे कृत्य केले आहे ते अशोभनीय आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रात्री 10 वा. नंतर जाहीर सभा व ध्वनीक्षेपकाचा वापर करता येत नाही, असे असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार सभेमध्ये रात्रौ 11.35 वा.पर्यंत ध्वनीक्षेपकावरून जाहीर भाषण केलेे. त्यामुळे ना. शिंदे यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून न्यायालयाचा अवमान केला आहे. याबाबत आपण जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर व्यासपीठावरील प्रमुख नेते मंडळी, मंत्री उदय सामंत, आ.नीलेश राणे व सभेच्या आयोजकांवरही न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी या पत्राद्वारे केल्याचे त्यांनी सांगितले. विनायक राऊत म्हणाले, कुडाळच्या सभेत जिल्हावासीयांनी एकनाथ शिंदे यांना ठेंगा दाखविला, सुरूवातीपासुनच खुर्च्या उचलून ठेवण्याची नामुष्की आयोजकांवर आली. जेमतेम 400 लोकांच्या उपस्थितीत सभा झाल्याचा दावा त्यांनी केला.

विनायक राऊत म्हणाले, कुडाळ येथील सभा रात्री संपल्यानंतर काही मंडळी कणकवलीत आली आणि त्यानंतर रंगीत पार्टीही झाली. दहशतवादी हल्ला होवून तीन दिवसही झाले नसताना कुडाळात रात्री सभा घेवून जल्लोष करण्यात आला, या प्रवृत्तीची माणसे महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत राज्याचे भले कसे होणार? जिल्हा पोलिस अधीक्षकांनी ध्वनीक्षेपकाच्या नियमबाह्य वापराबाबत आयोजक आणि पाहुण्यांवर कडक कारवाई करावी असे आपण पत्र दिले आहे. पोलिस अधीक्षकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यास गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले.

एकनाथ शिंदेंकडून कोकणचा भ्रमनिरास!

विनायक राऊत म्हणाले, निवडणूक झाल्यानंतर आता लाडक्या बहिणींच्या तोंडाला सरकारने पाने पुसण्याचे काम केले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सिंधुदुर्गला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले. मात्र या महाविद्यालयाच्या सध्या सुरू असलेल्या अधोगतीबद्दल सत्ताधार्‍यांना काहीही पडलेले नाही. वैद्यकीय महाविद्यालयातील पद भरतीसाठी काही करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली असती तर त्यांचा कोकणबद्दलचा कळवळा खरा वाटला असता. एकीकडे शिंदे यांनी कोकणाबद्दल गळा काढला आणि दुसरीकडे कोकण विकासाबद्दल काहीही न बोलता भ्रमनिरास केला, असा आरोप विनायक राऊत यांनी केला.

आ. नीलेश राणेंकडून एकनिष्ठेची शपथ हा विनोद

आ.नीलेश राणे म्हणतात, आपण जीवंत असेपर्यंत याच पक्षात राहणार, परंतु त्यांचे पिताश्री आणि हे दोन्ही बंधुंचा राजकीय जन्म ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमुळे झाला त्या ठाकरेंशी ते एकनिष्ठ राहिले नाहीत, ज्या काँग्रसमुळे त्यांना राजकीय स्थिरता लाभली त्यांच्याशी ते एकनिष्ठ राहू शकले नाहीत, ज्या भाजपने त्यांचे पिताश्री आणि दोन्ही भावांना राजकीय स्थिरता दिली त्या भाजपशी नीलेश राणे एकनिष्ठ राहिले नाहीत. आता केवळ राजकीय स्वार्थासाठी शिंदे शिवसेनेत ते गेले, त्या नीलेश राणे यांनी एकनिष्ठतेची शपथ घेणे, हा विनोद असल्याची खिल्ली श्री. राऊत यांनी उडवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT