बांदा : विलवडे-मळावाडी येथील सौ. रिया राजाराम दळवी (30) या नवविवाहित महिलेचा मृतदेह गावातील ओहोळात बुधवारी सकाळी आढळून आला. सोमवारपासून त्या बेपत्ता होत्या. अखेर तीन दिवसांच्या शोधानंतर बुधवारी सकाळी स्थानिकांना त्यांचा मृतदेह ओहोळातील पाण्यात दिसला.
याबाबत ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर बांदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. बांदा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या घटनेची फिर्याद मयताचा भाऊ सिद्धेश गोपाळ गावडे (रा. घारपी) याने दिली आहे. रिया या मूळच्या घारपी (ता. सावंतवाडी) येथील असून दीड वर्षांपूर्वी त्यांचा विवाह विलवडे येथील राजाराम दळवी यांच्याशी झाला होता. काही दिवसांपूर्वी त्या माहेरी घारपी येथे गेल्या होत्या. त्यानंतर घरी परतल्यानंतर सोमवारपासून (18) त्या बेपत्ता झाल्या होत्या. कुटुंबीय व पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असतानाच बुधवारी सकाळी ओहोळात तिचा मृतदेह सापडला.
वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, रिया यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचा अंदाज आहे. अंगावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळून आल्या नाहीत. त्यामुळे प्राथमिक चौकशीत घातपात नसल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. रियाच्या पश्चात पती, सासू-सासरे असा परिवार आहे. बांदा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.