कणकवली ः कणकवली उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आल्यानंतर प्लेटलटस् व रक्तदाब कमी होऊनही रुग्णाला उपचारासाठी दाखल न करता केवळ औषधे देऊन घरी पाठविले. दुर्दैवाने रुग्ण घरी परत जात असताना घरापासून काही अंतरावरच कोसळून त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे संतापलेल्या वागदे ग्रामस्थांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत घेराव घातला व डॉक्टरांना जाब विचारत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा दिला.
याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात येत ग्रामस्थांची समजूत घातली. पालकमंत्री नीतेश राणे यांनी मृत राजेंद्र गावडे यांच्या वारसाला शासकीय नोकरीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यानंतर तब्बल चार तासांनी हे घेराव आंदोलन मागे घेण्यात आले. वागदे-डंगळवाडी येथील राजेंद्र गावडे (वय 57) हे गुरुवारी उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आले होते. तेथील डॉक्टरांनी तपासणी करत औषधे देऊन राजेंद्र गावडे यांना घरी पाठविले. शुक्रवारी सकाळी त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने ते उपचारासाठी पुन्हा उपजिल्हा रुग्णालयात आले. यावेळी रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरने त्यांची तपासणी केली असता रक्तदाब 50 वर आला होता. तर रक्त तपासणी अहवालात प्लेटलेट्स 36 हजार एवढ्या खाली आल्या होत्या, असे रिपोर्ट असतानाही राजेंद्र गावडे यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले नाही.
राजेंद्र गावडे यांच्यासोबत त्यांचे भाऊ संतोष गावडे हे सुद्धा होते. त्यांनीही डॉक्टरांना राजेंद्र यांना रुग्णालयात दाखल करून घ्या असे सांगितले. मात्र डॉक्टरांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर डॉक्टरांनी दिलेली औषधे घेवून राजेंद्र गावडे हे वागदे-डंगळवाडी येथील घरी निघाले. घर काही अंतरावरच असताना वाटेवरच ते कोसळले. नातेवाईक व ग्रामस्थांनी तातडीने त्यांना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणले मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे राजेंद्र गावडे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत गावडे यांचे नातेवाईक व वागदे ग्रामस्थ संतप्त झाले. वागदे सरपंच संदीप गावडे, कणकवलीचे माजी नगरसेवक संजय कामतेकर, अण्णा कोदे, वागदे माजी उपसरपंच रुपेश आमडोसकर यांच्यासह ग्रामस्थांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत वैद्यकीय अधीक्षक डा ॅ. विशाल रेड्डी व कार्यरत डॉक्टरांना जाब विचारला. राजेंद्र गावडे यांच्या मृत्यूस कारणीभूत संबंधित महिला डॉक्टरवर कारवाई व्हायला हवी.
राजेंद्र गावडे हे मोलमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. तुमच्या निष्काळजीपणामुळे त्या कुटुंबाचा कर्ता पुरूष हरपला असून कुटुंबियांना आर्थिक मदत मिळालीच पाहिजे. झालेले नुकसान कसे भरून येणार आहे. जोपर्यंत भरपाई मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुबोध इंगवले यांनी कणकवलीत येत ग्रामस्थांशी चर्चा केली. मात्र संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम राहिले. याची माहिती डॉ. इंगवले यांनी दिल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील हे सुद्धा कणकवली उपजिल्हा रुग्णालयात पोहोचले. संतापलेल्या ग्रामस्थांनी रुग्ण गंभीर असतानाही त्याला उपचारासाठी दाखल करून का घेतले नाही? अशी विचारणा करत नुकसान भरपाई मिळायलाच हवी, अशी भुमिका घेतली. मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपजिल्हा रुग्णालयात पोहोचल्यानंतर कणकवली पोलिसांनी रूग्णालय परिसरात बंदोबस्त वाढवला.
दरम्यान याची माहिती पालकमंत्री नीतेश राणे यांना देण्यात आली. राजेंद्र गावडे यांच्या कुटुंबाचे झालेले नुकसान लक्षात घेवून त्यांच्या वारसाला शासकीय नोकरीत सामावून घेण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठविला जाईल व नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले तर जिल्हा शल्यचिकित्सक यांनी राजेंद्र गावडे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची ग्वाही दिल्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेतला. राजेंद्र गावडे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रंगकाम व इतर मजूरीची छोटी मोठी कामे करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत.