नांदगाव : चिरे वाहतूक करणारा ट्रक व कारमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारमधील महिला ठार झाली. सुप्रिया सुनील जावकर (56, रा. विजयदुर्ग-विठ्ठलवाडी ) असे तिचे नाव आहे, तर कारमधील बालकासह 2 प्रवासी गंभीर जखमी असून अन्य 4 जण किरकोळ जखमी झाले. शनिवारी तळेरे-विजयदुर्ग मार्गावर दारूम व बुरंबावडेच्या सीमेवर झाला.
फणसगाव परिसरातील चिरेखाणीतून निपाणीकडे चिरे वाहतूक करणारा ट्रक दारूम-बुरंबावडे सीमेवर आला असता याच दरम्यान तळेरे ते विजयदुर्ग जाणारी कार अचानक समोर आली व त्यांच्यात समोरसमोर भीषण धडक झाली. या अपघातानंतर स्थानिकांसह पोलिस हवालदार चंद्रकांत झोरे, 108 रूग्णवाहिकेचे डॉ.अनिरुद्ध मुद्राळे, चालक रूपेश राणे यांनी घटनास्थळी दाखल होत मदत केली.
या अपघातात कारमधील सुनील पांडुरंग जावकर (65), अर्थव मनिष जावकर (12), सुनैना सुधीर जावकर (65), सावित्री संदीप फाणसेकर (53), दीपा संदीप फाणसेकर (19), हर्ष संदीप फाणसेकर (16) व शैलेंद्र आप्पा मणचेकर (43, सर्व रा. विजयदुर्ग विठ्ठलवाडी) हे जखमी झाले आहेत. या सर्वाना प्रथम कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबतचा अधिक तपास कणकवली पोलिस करीत आहे.
यातील दीपा फणसेकर, सुनैना जावकर व बालक अर्थव जावकर या तिघांची परिस्थिती गंभीर बनल्याने त्यांना सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा रूग्णालयात दाखल केले. हा अपघात नेमका कसा घडला, हे समजू शकले नाही.