विजयदुर्ग : आपण एका विज्ञानातील शोधाचा आज वाढदिवस येथे साजरा करत आहोत. विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात या तंत्रज्ञान व विज्ञान शोधाचे जनक व्हावे, असे आवाहन माजी आ. प्रमोद जठार यांनी केले. ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावर सोमवारी जागतिक ‘हेलियम डे’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला नेहरू विज्ञान केंद्र मुंबईचे सुहास नाईक साटम, विज्ञान प्रेमी डॉ. सुनील आठवले, पवन परूळेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
शासनाच्या वतीने सिंधुरत्न कार्यकारणी समिती व विजयदुर्ग ग्रामपंचायतींच्या विद्यमाने विजयदुर्ग किल्ल्यावर दरवर्षी ‘हेलियम दिन’ साजरा करण्यात येतो. विजयदुर्ग ग्रामपंचायत सरपंच रियाज काझी यांनी या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे तसेच विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या निमित्त विजयदुर्ग एस.टी आगार ते विजयदुर्ग किल्ल्यावरील साहेबांचे ओटे अशी हेलियम वायूचे फुगे घेऊन ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये विजयदुर्ग पंचक्रोशीतील ग्रामस्थ, आय. ई. एस विद्यालयाचे विद्यार्थी, फाटक नर्सिंग विद्यालय, जामसंडे येथील विद्यार्थी हातात हेलीम वायूचे भरलेले फुगे घेऊन सहभागी झाले होते. ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’ अशा घोषणा देण्यात आल्या.
विजयदुर्ग किल्ल्यातील साहेबांचे ओटे येथे शालेय मुलांनी फुगे हवेत सोडत व प्रमोद जठार यांनी हेलियम मार्गदर्शक फलकाला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुसज्ज विज्ञान केंद्र व्हावे,अशी अपेक्षा व्यक्त करतांना प्रमोद जठार यांच्या प्रयत्नाने भावी पिढीत विज्ञानाची आवड निर्माण होत असल्याचे सुहास नाईक -साटम यांनी सांगितले. डॉ. सुनील आठवले यांनीही हेलियम वायू संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विजयदुर्ग हायस्कूलचे शिक्षक श्री. परचंडे यांनी हेलियम वायू शोधाची माहिती तसेच या वायूचे फायदे काय आहेत, याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.
माजी आ. प्रमोद जठार, विजयदुर्ग सरपंच रियाज काझी, देवगडचे माजी उपसभापती रवी तिर्लोटकर, इतिहास प्रेमी राजेंद्र परूळेकर, पडेल मंडल भाजपा महिला अध्यक्ष सुप्रिया आळवे, शिडवणे सरपंच रवींद्र शेटेये, पं. स. माजी सदस्या शुभा कदम, विजयदुर्ग पोलिस निरीक्षक संजय कातिवले, भाजपा सचिव प्रदीप साखरकर आदी उपस्थित होते.