विजयदुर्ग : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा व मराठी आरमाराच्या पराक्रमाची अस्मिता असलेला किल्ले विजयदुर्ग मुख्य प्रवेशद्वार नव्याने तयार करून त्याची उभारणी करण्यात आली. मात्र हा नव्याने करण्यात आलेला दरवाजा ऐतिहासिक किल्ल्याच्या योग्यतेचा नाही याबाबत असंख्य इतिहासप्रेमींची प्रचंड नाराजी असल्याने आणि ऐतिहासिक संदर्भाशी मिळते जुळते नसल्याने विजयदुर्ग किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर बसविण्यात आलेले प्रत्येकी एक-एक टनाचे दरवाजे अखेर काढण्यात येणार असल्याचे केंद्रीय पुरातत्त्व विभाग, विजयदुर्ग उपमंडळ संरक्षक सहायक राजेश राजेश दिवेकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे इतिहास प्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.
या दरवाजाची बांधणी आणि वापरलेले कोवळे लाकूड या संदर्भात विजयदुर्ग ग्रामपंचायत, किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती, सह्याद्री प्रतिष्ठान ( सिंधुदुर्ग विभाग), गडकिल्ले संवर्धन संस्था( कोकण विभाग) या सर्वांनीच आपला संताप व्यक्त करून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या उच्च अधिकार्यांकडे स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती. आर्कोमो कंपनीने हा दरवाजा विजयदुर्ग किल्ल्यासाठी बनविला होता. मात्र इतिहासप्रेमी संघटना आणि अनेक व्यक्तींनी मोठी नाराजी व्यक्ती केल्यानंतर भारतीय पुरातत्त्व विभागाने आर्किमो कंपनीला सदर दरवाजा काढून ऐतिहासिक संदर्भाशी मिळताजुळता दरवाजा आणि तत्कालीन पूरक दरवाजा नव्याने बनविण्यात यावा असं सांगण्यात आले.
या संदर्भात विजयदुर्ग ग्रामपंचायतीने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र दिले होते. प्रत्यक्ष पाहणी करण्याची त्यांना विनंती करण्यात आली होती. या पत्रात कोवळे आणि निकृष्ट दर्जाचे लाकूड वापरल्याने तसेच त्याची बांधणीही पूर्वीच्या दरवाजाप्रमाणे नसल्यामुळे पुरातत्व विभागाच्या नियमावलीस अनुसरून या दरवाजाचे काम झाल्याचे दिसत नाही असा उल्लेख करण्यात आला होता. ही बाब अतिशय संवेदनशील आणि लोकभावनेची असल्याने पुरातत्त्व विभागाला कळविण्यात यावी, असं प्रभारी सरपंच रियाज काझी यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात नमूद केले होते. दरम्यान, किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर यांनी पुरातत्त्व विभागाचे संरक्षक सहाय्यक राजेश दिवेकर यांच्याशीही संपर्क साधून नाराजी व्यक्त केली होती.
यावेळी त्यांनी सदर दरवाजाला तत्कालिन कामाचा बाज नसून बरीच वर्षे काम चालू असतानाही दरवाजाचे काम निकृष्ट असल्याचे स्पष्ट केले होते; मात्र आता इतिहासप्रेमींची आणि संघटनांची दखल घेऊन हा दरवाजा नव्याने बसविण्याचा निर्णय घेतल्याने समाधान व्यक्त होत आहे. मात्र ज्या ज्या वेळी विजयदुर्गच्या इतिहासाला धक्का पोहोचेल किंवा अशा प्रकारचं काम होईल त्या त्या वेळी विजयदुर्ग ग्रामस्थ नक्कीच आक्रमक होतील, असा इशारा विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर यांनी दिला आहे.
ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याला काही दिवसापूर्वी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने लाकडी दरवाजे बसविले. साधारण एक-एक टनाचे हे दोन दरवाजे वादामध्ये सापडले होते. या लाकडाचा दर्जा आणि बांधणी निकृष्ट दर्जाची असल्याने विजयदुर्ग ग्रामस्थ तसेच इतिहासप्रेमींमधून संताप व्यक्त होत होता.