विजयदुर्ग : ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याच्या साफसफाईसाठी जिल्ह्यातील अनेक संस्था तसेच मंडळे विजयदुर्ग येथे रोज येत आहेत. विजयदुर्ग विठ्ठलवाडी मित्रमंडळ, प्रेरणोत्सव समिती आणि शिवप्रेमी धोपटेवाडी ग्रामस्थ, जामसंडेच्या शेकडो कार्यकत्यांनी विजयदुर्ग किल्ल्याची साफसफाई केली. अनेक शिवभक्त स्वखचनि विजयदुर्ग येथे महास्वच्छता अभियानात आपला हातभार लावण्यासाठी येत आहेत.
सरपंच रियाज काझी, विजयदुर्ग किल्ले प्रेरणोत्सव समिती अध्यक्ष प्रसाद देवधर, विठ्ठलवाडी मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय सावंत, धोपटेवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष विजय धोपटे, उपाध्यक्ष महेश भुजबळ, सचिव रवींद्र टुकरुल, सल्लागार गिरीश धोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी किल्ले विजयदुर्गचे बुरुज तसेच झाडीझुडपांची सफाई केली.
जागतिक वारसा स्थळात नामांकन मिळालेल्या विजयदुर्ग किल्ल्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी युनेस्कोची टीम ६ ऑक्टोबर रोजी विजयदुर्ग येथे येणार आहे. विजयदुर्गची निवड जागतिक वारसा स्थळात होण्यासाठी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक संघटना, शिवप्रेमी दरदिवशी किल्ले विजयदुर्ग येथे स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्यासाठी येत आहेत. ५ ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम सातत्याने राबविण्यात येणार आहे.
या साफसफाई कामावेळी कार्यकत्यांना दुखापत झाल्यास १०८ अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परूळेकर यांनी विशेष प्रयत्न केले. २९ ऑक्टोबरपासून सकाळी ११ ते सायंकाळी ५ वा. पर्यंत ही रुग्णसेवा किल्ल्याच्या पायथ्याशी उपलब्ध असणार आहे.