अजित पवार-शरद पवार दौरा करणार  Pudhari Photo
सिंधुदुर्ग

Konkan Politics | कोकणात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीचा 'फड' रंगणार

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'साहेब' अन् 'दादां'नी कोकणावर लक्ष केंद्रीत केले आहे. पश्चिम महाराष्ट्र व राज्याच्या अन्य विभागांचा दौरा केल्यानंतर शरद पवार व अजित पवार हे काका - पुतणे दि. २१ ते २३ रोजी कोकणच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे कोकणात येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा फड रंगणार आहे. कोकणच्या केंद्रस्थानी असणाऱ्या चिपळूणमध्ये दोन्ही नेते परस्पर विरोधात तळ ठोकणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणचे आ. शेखर निकम तर रायगडमधून मंत्री आदिती तटकरे तर रायगड लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे ही अजित पवार

राष्ट्रवादी गटाची बलस्थाने आहेत तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा या तिनही जिल्ह्यात एकही आमदार किंवा खासदार नाही. तरी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कोकणकडे विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा कोकणातील प्रचाराचा नारळ हे दोन्ही नेते चिपळुणातून फोडणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार दि. २१ रोजी चिपळूणमध्ये 'जनसन्मान' यात्रा काढणार आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार दि. २२ व २३ रोजी चिपळुणात येत आहेत. चिपळूण विधानसभा मतदारसंघातून अजित पवार राष्ट्रवादी गटाचे आ. शेखर निकम यांच्या विरोधात शरद पवार गटाने काँग्रेसकडून राष्ट्रवादीत प्रवेश करवून घेतलेले प्रशांत यादव यांचे नाव समोर आणले आहे. मात्र,

महाविकास आघाडीकडून या नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. शरद पवार यांच्या दौऱ्यात चिपळूणची उमेदवारी महाविकास आघाडीकडून प्रशांत यादव यांना जाहीर होईल का? याबाबत उत्सुकता आहे. 'साहेब' आणि 'दादां'च्या दौऱ्याने कोकणचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे.

जायचे कोणाकडे...?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या तिनही जिल्ह्यातील आपापले जुने कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आजी-माजी नेत्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे कोण कोणाच्या सभेत हजेरी लावतो, कोण कोणाच्या चर्चेत सहभाग घेतो यावर कोकणवासीयांचे लक्ष असणार आहे. आता दोन्ही नेत्यांनी लागोपाठ सभा, बैठकांचे नियोजन केल्याने नेमके जायचे कोणाकडे? हा देखील अनेकांसमोर प्रश्न आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्याबाबत कोकणात कमालीची उत्सुकता आहे.

महायुती विरूद्ध आघाडी संघर्ष पेटणार...

आगामी विधानसभेच्या दृष्टीने शरद पवार राष्ट्रवादी पक्षातर्फे कोकणात विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी आणि दापोली मतदारसंघावर महाविकास आघाडी लक्ष केंद्रीत करणार आहे. त्या दृष्टीने उमेदवारांची चाचपणी, त्यांना मिळणारा प्रतिसाद, महाविकास आघाडीची ताकद आणि जिंकून येण्याची क्षमता या निकषावर देखील दोन्ही गटाच्या नेत्यांकडून या दौऱ्यात चाचपणी होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT