वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील पेंडूर कोल्हेभाटले येथून ६९ हजार रुपये किमतीचे लोखंडी प्लेट चोरीस गेल्याची घटना घडली आहे. ही घटना १७ डिसेंबर रोजी रात्री घडली आहे. याप्रकरणी आज बुधवार १८ डिसेंबर रोजी पेंडूर ग्रामपंचायत सरपंच संतोष दशरथ गावडे यांनी वेंगुर्ले पोलीस स्थानकात चोरीबाबत फिर्याद दिली आहे.
दाखल फिर्यादीनुसार वेंगुर्ले पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की , पेंडूर ग्रामपंचायत मधील शिपाई घनश्याम दशरथ नाईक हे कोल्हेभाटले येथील बंधाऱ्याजवळ असणाऱ्या शेडची पाहणी करण्याकरिता गेले असता सदर बंदिस्त स्लॅप वर प्रोफाइल पत्रे आच्छादलेले शेडचे कुलूप कोणीतरी अज्ञाताने फोडले. व आत प्रवेश करून आत मध्ये बंधाऱ्यासाठी ठेवलेले ६९ हजार रुपये किमतीचे ४.५ फूट रुंद, २ फूट उंचीचे लोखंडी धातू ने एकूण २४ प्लेट (प्रत्येक प्लेटची किंमत २८७५ रुपये) लोखंडी प्लेट चोरून नेल्या आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक हेमचंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस हवालदार रंजिता चौहान या अधिक तपास करीत आहेत.