मळगांव : वेंगुले तालुक्यातील उबाठा शिवसेनेचे युवा युवा नेतृत्व नीलेश चमणकर यांनी जिद्द दाखवत तालुक्यातील 5 पैकी 2 जिल्हा परिषद मतदारसंघात विजय खेचून आणला आहे, याचा विशेष गर्व आहे. त्यांनी दोन्ही ठिकाणी मिळविलेले विजय पाहता धनशक्तीपुढे जनशक्ती सरस ठरली आहे. पंचायत समितीवर यश मिळाले नसले तरी जिल्हा परिषदेसाठी तालुक्यात ठाकरे सेनेचे आजही मोठे अस्तित्व आहे, हे अधोरेखित झाले आहे, असे प्रतिपादन वेंगुर्लेचे सुपूत्र व मुंबई-माहिमचे ठाकरे सेनेचे आ. महेश सावंत यांनी केले.
वेंगुर्ले तालुक्यातील 5 जि. प. गटापैकी 2 जिल्हा परिषद मतदारसंघावर ठाकरे शिवसेना पक्षाने भरीव यश मिळवले. यनिमित्त आ.महेश सावंत यांनी वेंगुर्ले येथे येत आडेली गटाचे सदस्य विजय नाईक व उभादांडा गटाचे सदस्य संजय गावडे यांचा वेंगुर्ले-सुंदरमाटले येथील ठाकरे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात विशेष सत्कार केला. यावेळी आ. सावंत बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख निलेश चमणकर, जिल्हाप्रमुख व आडेली माजी सरपंच प्रकाश गडेकर, शहर अध्यक्ष शैलेश परुळेकर, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख राजू नाईक, दिलीप ठाकुर, युवा नेते स्वप्नील गडेकर, अभिनव मांजरेकर, शिवदूत अशोक परब, दिलीप राणे, युवासेना उपतालुकाप्रमुख वैभव फटजी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आ. सावंत म्हणाले, वेंगुर्लेचे माजी सभापती जयप्रकाश चमणकर व आडेलीचे माजी सरपंच प्रकाश गडेकर यांनी दोन्ही जिल्हा परिषदेत सर्वाना साथीला घेत कष्ट घेतल्याने आपण दोन जागा जिंकू शकलो. त्यामुळे दोघेही दोन्ही मतदारसंघात किंगमेकर ठरले आहेत. या वयात त्यांनी ठाकरे शिवसेनेच्या विजयासाठी घेतलेली मेहनत महत्वाची ठरली. दोघेही सैनिकाप्रमाणेच लढले. जनतेनेही ठाकरे शिवसेनेला मोठी साथ दिली. त्यामुळे आम्हाला तालुक्यातील सर्वाधिक (2 जागा) जागा यश मिळाले. जयप्रकाश चमणकर व प्रकाश गडेकर हे गेली 40-45 वर्षे राजकारणात तसेच समाजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या अनुभवाचा व इतर सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, महिला-भगिनी यांचाही रोल सक्रिय राहिल्याने ठाकरे शिवसेना मोठी झेप घेऊ शकली. चमणकर व गडेकर या दोन्हीचे कुटुंबीय गेली अनेक वर्षात सर्वसामान्य नागरिकांशी जोडली गेली असल्याने जनतेने अपेक्षित साथ दिली. पुढील कालावधीत उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष वाढीसाठी मी स्वतः, माजी आ. वैभव नाईक व माजी खा. विनायक राऊत विशेष लक्ष पुरवून या मतदारसंघाच्या विकासासाठी सतत कार्यरत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
संजय गावडे यांनी कोविड योद्धा म्हणून केलेले कार्य त्यांना मोठे लीड देण्यास उपयुक्त ठरले. तसेच विजय नाईक यांचे गेल्या 25-30 वर्षातील योगदान व मुख्यतः कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत यामुळे दोन्ही ठिकाणी विजय शक्य झाला, असेही ते म्हणाले. श्री.चमणकर म्हणाले, आज दोन्ही ठिकाणी उभादांडा जि. प. मधील व आडेली जि. प. मधील जनतेची मिळालेली साथ यामुळे आमच्या वेंगुर्ले तालुक्याचे नाव जिल्हाभरात गेले आहे. संजय गावडेसारखा आयडॉल व विजय नाईक यांनी जनतेच्या व पदाधिकारी यांच्या साथीने आडेलीत भाजपला सुपर धक्का दिला आहे. आ. महेश सावंत यांनी दोन्ही मतदारसंघात दिलेला वेळ, माजी खा. विनायक राऊत व माजी आ. वैभव नाईक यांचीही उपयुक्त साथ आम्हाला तालुक्यात मोठे यश मिळविण्यास फायदेशीर ठरली. पंचायत समितीवर अपयश आले असले तरी तालुक्यातील सर्व जि. प. गटनिहाय ठाकरे सेना संघटना मजबूत करणे व संघटना वाढविणे यासाठीच वडील जयप्रकाश चमणकर व सर्वाच्या साथीने आपले पुढील 5 वर्षात प्रयत्न सुरूच राहणार आहेत, असेही ते म्हणाले.