वेंगुर्ले : वेंगुर्ले शहरामध्ये मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात शहरातील कुंभवडा येथील युवराज राजेश निषाद हा अडीच वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वेंगुर्ले शहरांमध्ये दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असून त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरात भटक्या कुत्र्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता वेंगुर्ले नगरपरिषदेने गेल्या वर्षी काही प्रमाणात या मोकाट कुत्र्यांना आवर घालण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सद्यस्थितीत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा वावर शहरात वाढला असल्याने लहान मुलांसह नागरिकांना या मोकाट कुत्र्यांपासून धोका निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
वेंगुर्ले शहरांमध्ये मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येने ठिकठिकाणी नागरिक त्रस्त झाले असून यापूर्वी गाडी अड्डा, जुना स्टॅन्ड, अशा विविध ठिकाणी मोकाट कुत्र्यांनी लहान मुलांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या असून देखील नगरपरिषद प्रशासन मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना करत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मुलांवर मोकाट कुत्र्यांकडून होणारे हल्ले पहाता वेंगुर्लेतील प्रशासकीय अधिकार्यांबरोबरच स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील ही बाब गांभीर्यपूर्वक पक्षात घेऊन मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताकरिता तात्काळ ठोस भूमिका घेऊन लहान मुलांवर होणारे मोकाट कुत्र्यांचे हल्ले थांबविण्यात यावे अशी मागणी स्थानिक रहिवासी व नागरिकांतून होत आहे.