वेंगुर्ले तालुक्यात कोसळणार्‍या पावसामुळे वेंगुर्ले बंदरावर खवळलेला समुद्र किनारा.  (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Vengurla Port Sea Warning | वेंगुर्ले बंदरावर समुद्र खवळला

बंदर विभागाकडून धोक्याचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

मळगाव : वेंगुर्ले तालुक्यात जोरदार पडणार्‍या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून भात शेती पाण्याखाली गेली आहे. अरबी समुद्र खवळला आहे. मासेमारीसाठी जाणार्‍या मच्छीमारांना बंदर विभागाने वेंगुर्ले बंदरवर तांबड्या रंगाचा बावटा फडकवून धोक्याचा इशारा दिला आहे.

वेंगुर्ले तालुक्यात गेले पाच दिवस पावसाची संततधार सुरू असल्यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. पुराच्या पाण्याखाली येथील शेतकर्‍यांची भात शेती गेली आहे. सतत पडणार्‍या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वेंगुर्ले आगारातून सावंतवाडी व कुडाळच्या दिशेने जाणार्‍या एसटी बसेस पावसामुळे उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

सतत पडणार्‍या पावसामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पावसाचे प्रमाण वाढले आहे. तसेच पाऊस आणि वारा असल्यामुळे समुद्र खवळलेला आहे. समुद्रातील उंच उंच लाटा किनार्‍यावर येऊन आदळत आहेत. त्यामुळे किनारवर्ती भागाची झीज झाली आहे. बंदर विभागाने धोक्याचा इशारा म्हणून तांबड्या रंगाचा बावटा फडकवल्याने समुद्रात मच्छीमार मासेमारीसाठी जाणे टाळत आहेत.

तालुक्यात 1 ऑगस्ट पासून मच्छीमारांनी नवीन मासेमारी हंगामाला सुरुवात केली होती. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने किनारपट्टी भागात पावसाची संततधार व अधून मधून वाढणारा वार्‍याचा वेग त्यामुळे मच्छीमारांच्या मच्छीमारी नौकांना धोका निर्माण होऊन अनर्थ होऊ शकतो. समुद्रातील धोका टाळला नसल्यामुळे बंदर विभागाने वेंगुर्ले बंदरावर तांबड्या रंगाचा बावटा फडकवून मच्छीमार तसेच नागरिकांना समुद्राच्या पाण्यात न जाण्याचा इशारा दिला आहे. वेंगुर्ले बंदर वर बंदर विभागाने समुद्रातील प्रतिकूल वातावरण पाहून तांबड्या रंगाचा फडकवल्यामुळे मच्छीमाराने मासेमारीसाठी बंदर विभाग व मत्स्य विभागाच्या पुढील सूचना मिळत नाही तोपर्यंत समुद्रात न जाण्याचे ठरवून मच्छीमारी नौका मच्छीमाराने सुरक्षित खाडीपात्रात आणून लावून ठेवले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT