वेंगुर्ले : वेंगुर्ले मठमार्गे सावंतवाडी मार्गांवर अतिवेगाने कार चालवीत असताना आडेली येथील युवकाने मठ हायस्कुल समोरील कमानीच्या संरक्षक कठड्यास बुधवारी रात्री जोरदार धडक दिली होती. दरम्यान यावेळी गस्तीवर असणाऱ्या वेंगुर्ले पोलीस निरीक्षक तसेच अन्य पोलिसांना अपघाताबाबत विचारणा केली असता कारचालक साईप्रसाद उर्फ गोट्या विजय नाईक (वय 32, रा. आडेली) याने संबंधित पोलिसांनाच शिवीगाळ व धमकी दिली होती. त्यानुसार संबंधितावर वेंगुर्ले पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करून त्यास शुक्रवारी अटक करण्यात आली होती.
दरम्यान आज शनिवारी वेंगुर्ले पीएसआय योगेश राठोड यांनी त्यास कुडाळ न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 13 ऑक्टोबर पर्यंत 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय योगेश राठोड हे अधिक तपास करीत आहे.