वेंगुर्ला (पुढारी वृत्तसेवा):
दिल्लीतील बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर संपूर्ण देशभरात सुरक्षा यंत्रणा सावध झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला पोलीस ठाण्यानेही हाय अलर्ट घोषित केला आहे. वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुक्यात सुरक्षा तपासणी आणि गस्त वाढवण्यात आली आहे.
सध्या वेंगुर्ला तालुक्यातील प्रत्येक प्रमुख रस्ता, किनारपट्टी आणि चेकपोस्टवर पोलिसांचा कडक पहारा ठेवण्यात आला आहे.
पीएसआय शेखर दाभोलकर, पीएसआय योगेश, सागरी सुरक्षा अंमलदार श्री. सरमळकर, हवालदार भगवान चव्हाण, वाहतूक पोलीस मनोज परुळेकर आणि हवालदार योगेश राऊळ यांच्यासह पोलीसांचे पथक दिवसरात्र गस्त घालत आहे.
वेंगुर्ला शहर आणि आसपासच्या परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. रेडी चेक पोस्ट आणि श्री देव मानसीश्वर मंदिराजवळील मुख्य रस्त्यावर विशेष नाकाबंदी करण्यात आली असून संशयास्पद वाहनांची तपासणी सुरू आहे.
वेंगुर्ला हा समुद्रकिनाऱ्यावरील संवेदनशील भाग असल्याने लँडिंग पॉइंटवरही पोलिसांचा पहारा वाढवण्यात आला आहे.
सागरी सुरक्षेसाठी पोलीसांनी वेंगुर्ला बंदर आणि अन्य किनारी भागात पेट्रोलिंग सुरू केले आहे. संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
वेंगुर्ला शहरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पाच होमगार्ड नेमण्यात आले आहेत. नागरिकांना सुरक्षिततेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. संपूर्ण वेंगुर्ला पोलीस ठाणे सध्या अलर्ट मोडवर कार्यरत असून कोणतीही संशयास्पद घटना घडू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की,
कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलीसांना कळवावी,
समुद्रकिनाऱ्यांवर अनोळखी व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास सावध राहावे,
अफवा पसरवू नयेत आणि अधिकृत माहितीलाच विश्वास द्यावा.
देशभरातील सुरक्षा परिस्थिती लक्षात घेऊन वेंगुर्ला पोलिसांचे हे पाऊल महत्त्वाचे ठरत असून नागरिकांनीही जबाबदारीने सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.