वेंगुर्ले : महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून २ ते ८ जानेवारी या कालावधीत पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने वेंगुर्ले पोलीस ठाणे आणि बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि.८) सकाळी बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ले येथे रेझिंग डे साजरा करण्यात आला. यावेळी खर्डेकर महाविद्यालय एनसीसी व एनएसएस पथक तसेच वेंगुर्ले पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांच्या वतीने खर्डेकर महाविद्यालय ते दाभोली नाका, शिरोडा नाका ते खर्डेकर महाविद्यालय अशी जनजागृती रॅली काढण्यात आली.
यावेळी विविध घोषवाक्य देत शहरात जनजागृती करण्यात आली.त्यानंतर खर्डेकर महाविद्यालय येथे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी विद्यार्थ्यांना विविध शस्त्रांसंबधित माहिती दिली व मार्गदर्शन केले. दैनंदिन पोलीस कामकाजाविषयी माहिती दिली. तसेच वाहतुकीचे नियम व सुरक्षा तसेच सायबर फ्रॉड या संदर्भात माहिती दिली. डायल वन टू बाबत माहिती सांगून अडचणीच्या वेळी सदर कार्यप्रणालीचा उपयोग कसा करता येईल, याची माहिती दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले ,संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, माजी नगरसेवक विधाता सावंत, वाहतूक पोलीस अंमलदार मनोज परुळकर, गौरव परब, पोलीस हवालदार सुरेश पाटील, सखाराम परब तसेच सुमारे 70 विद्यार्थी आदी उपस्थित होते.