वेंगुर्लाः वेंगुर्ला तालुक्यात आज रविवारी बरसलेल्या पावसाने भातशेतीत जलमय स्थिती आहे. शेतकरी वर्गाचे गवत कुजून गेले असून वातावरणात बदल झाला आहे. एकूणच हवामान विभागाने दर्शविलेला अंदाज एकदम तंतोतंत खरा ठरला आहे. तालुक्यात आज 39 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण 2197 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान गेल्या 8 दिवसात तालुक्यात कोणतीही नुकसानीची नोंद नाही. सायंकाळी उशिरा पाऊस बरसत होता.
मासेमारीही बंद
वेंगुर्ला बंदरात मासेमारी पूर्णतः बंद असून हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याचे व सूचनांचे मच्छिमार बांधवांकडून तंतोतंत पालन केले जात आहे. गोवा, मालवण, मडगाव आदी भागातून वेंगुर्ला तालुक्यात मासे उपलब्ध होत आहेत. यात मुख्यत्वे सुरमई, बांगडा, सरंगा इत्यादी माशांची चांगली आवक व उपलब्धता असल्याने मत्स्य खवंय्यातून समाधान व्यक्त होत आहे. अन्य मासेही कमी अधिक प्रमाणात उपलब्ध होते.
समुद्रात वारे अधूनमधून जोरात वाहत असून 30 ऑक्टोबर पर्यंत समुद्रात अशीच स्थिती राहण्याचा अंदाज जाणकार मच्छिमारांकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान बीएसएनएल सेवा वागळता अन्य कंपन्याची रेंजच गायब झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली.