Tree Cutting Pudhari File Photo
सिंधुदुर्ग

Dodamarg Tiger Corridor | "सावंतवाडी-दोडामार्ग व्याघ्र कॉरिडॉरमध्ये वृक्षतोड! 'वनशक्ती'ची उच्च न्यायालयात अवमान याचिका"

Dodamarg Tiger Corridor | 'वनशक्ती'ची उच्च न्यायालयात अवमान याचिका ; शासन व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निशाणा

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील संवेदनशील अशा व्याघ्र कॉरिडॉरमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड व उत्खनन करून पर्यावरणावर आघात केल्याचा गंभीर आरोप 'वनशक्ती' संस्थेने केला आहे. न्यायालयाच्या स्पष्ट आदेशांनंतरही ही कारवाई न थांबल्यामुळे केंद्र व राज्य शासनासह महसूल आणि वनविभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.

दोडामार्ग तालुक्यातील कोलझर येथे गावाबाहेरील काही व्यक्तींनी जमिनी खरेदी करून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड व बेकायदेशीर उत्खनन चालवले होते, ही बाब स्थानिक ग्रामस्थांनी उघडकीस आणली होती. याशिवाय सावंतवाडी तालुक्यातील सरमळे येथेही वृक्षतोडीचा असाच प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर वनशक्ती संस्था आणि संस्थेचे संचालक स्टॅलिन दयानंद यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

याचिक्यातील मुख्य मुद्दे व उच्च न्यायालयाचे निर्देश

या याचिकेत केंद्राचे पर्यावरण व वन मंत्रालय, राज्याचे पर्यावरण, वन व महसूल सचिव, राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक आणि सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. सावंतवाडी व दोडामार्ग या दोन्ही तालुक्यांतील समृद्ध जैवविविधता लक्षात घेता, येथे वाघ व इतर वन्यजीवांचा महत्त्वाचा कॉरिडॉर आहे. या क्षेत्राला 'इको-सेंसिटिव्ह एरिया' (ESA) घोषित करण्यासाठी वनशक्तीने यापूर्वीच न्यायालयात याचिका दाखल केली होती.

त्यावर २२ मार्च २०२४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने अंतिम अधिसूचना जारी होईपर्यंत या भागात कोणतीही वृक्षतोड किंवा पर्यावरणाला घातक कामे करण्यास पूर्ण बंदी घातली होती. या आदेशाच्या अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, जिल्हा उपवनसंरक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांवर सोपवण्यात आली होती, तसेच यासाठी विशेष 'टास्क फोर्स' स्थापन करण्याचे निर्देशही दिले होते.

टास्क फोर्सच्या कामात त्रुटी

याचिकाकर्त्यांनी जानेवारी महिन्यात या भागात प्रत्यक्ष पाहणी केली असता सरमळे आणि कोलझर येथे मोठ्या प्रमाणावर निसर्गाचा ऱ्हास झाल्याचे निदर्शनास आले. माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीवरून टास्क फोर्सच्या कामकाजातही गंभीर त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले. न्यायालयाच्या स्पष्ट मनाई हुकुमानंतरही वृक्षतोड आणि उत्खनन सुरूच राहिल्याने हा थेट न्यायालयाचा अवमान असून, यातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

"दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील या समृद्ध पर्यावरण असलेल्या क्षेत्रावर दिल्ली लॉबीसह इतर जमीन माफियांनी वक्रदृष्टी फिरवली आहे. स्थानिकांनी पिढ्यानपिढ्या जपलेल्या निसर्गावर बुलडोझर चालवणाऱ्या अशा गुंतवणूकदारांना त्याची किंमत मोजावीच लागेल. आम्ही या संवेदनशील क्षेत्रातील इतर वृक्षतोडीची प्रकरणेही गांभीर्याने हाती घेत आहोत. या भागातील निसर्ग आणि त्याला जोडलेले स्थानिकांचे लोकजीवन अधिक समृद्ध करण्यासाठी वनशक्तीचा हा लढा आहे."
— स्टॅलिन दयानंद (संचालक, वनशक्ती)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT