वैभववाडीत मोकाट जनावरांचा वाढता उपद्रव : अपघातांचा धोका 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News | वैभववाडीत मोकाट जनावरांचा वाढता उपद्रव : अपघातांचा धोका

नगरपंचायतीने तातडीने बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

वैभववाडी : वैभववाडी शहरात गेल्या काही महिन्यांपासून मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ तसेच भर चौकात मोकाट जनावरे ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अचानक जनावरे रस्त्यावर आडवी येत असल्याने दुचाकीस्वार व वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला असून काही ठिकाणी छोटे-मोठे अपघातही घडत आहेत. नगरपंचायतीने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

शहरातील बाजारपेठ परिसर, मुख्य चौक आणि रहदारीच्या रस्त्यांवर दिवसभर मोठ्या संख्येने मोकाट जनावरे फिरताना दिसून येतात. अनेकदा ही जनावरे रस्त्याच्या मधोमध बसून राहत असल्याने वाहनांना मार्ग काढताना कसरत करावी लागते. विशेषतः गर्दीच्या वेळेत वाहतुकीचा वेग मंदावून कोंडीची परिस्थिती निर्माण होते. रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसलेली जनावरे वाहनचालकांच्या लक्षात उशिरा येत असल्याने अपघाताची शक्यता अधिक वाढते.

शहराचा विस्तार आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता मोकाट जनावरांचा प्रश्न भविष्यात गंभीर होण्याची शक्यता आहे. केवळ वाहतुकीचा प्रश्न म्हणून न पाहता नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. जनावरांच्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई करावी, तसेच मोकाट जनावरांना पकडण्यासाठी नियमित मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT