वैभववाडी : आंघोळीसाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलींचा करूळ जामदारवाडी येथील धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.१३) सायंकाळी ४.३० च्या सुमारास घडली. तन्वी आनंद माळकर (वय १६, रा. करूळ भोईडेवाडी), स्वरा संदीप सुर्वे (वय ११, मुळगाव कुसुर सध्या राहणार मुंबई), ऋतिका संतोष पाटील (वय १८, रा. करूळ भोयडेवाडी सध्या रा. मुंबई) मृत मुलींची नावे आहेत.
करूळ भोईडेवाडी येथील विलास काशीराम वारंग यांच्या आईचे बाराव्याचे कार्य व उत्तरकार्य होते. या निमित्ताने मुंबईहून नातेवाईक आले होते. कार्य आटोपल्यानंतर सायंकाळी सात मुले धरणावर आंघोळीसाठी व धरणानजीक असलेल्या केदारलिंग मंदिरात देवाला नारळ अर्पण करण्यासाठी गेली होती. यावेळी तन्वी माळकर, स्वरा सुर्वे व ऋतिका पाटील या धरणातील खोल पाण्यात गेल्या. आंघोळीपूर्वी त्यांनी एकत्रित फोटो आणि सेल्फीही काढले. त्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्या पाण्यात बुडू लागल्या. सोबत असलेल्या मुलांनी आरडाओरडा केला. त्यानंतर खाली मंदिरात असलेले विलास वारंग हे धावत धरणाच्या दिशेने आले. तर यापैकी एका मुलाने घटनेची माहिती घरी फोन करून दिल्यामुळे वाडीतील ग्रामस्थांनी धरणाकडे धाव घेतली.
करूळ बौद्धवाडी येथील यश देवेंद्र पवार, आकाश सुर्वे, विलास काशीराम वारंग, सुशील रामकृष्ण माळकर, संजय रामकृष्ण वारंग,संजय हरिश्चंद्र वारंग,बाळकृष्ण वारंग यांनी धरणात उतरून त्या बुडालेल्या तिन्ही मुलींना बाहेर काढले मात्र, बाहेर काढण्यापूर्वीच त्या तिघांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती वैभववाडी पोलिसांना मिळतात वैभवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तर नायब तहसीलदार दिलीप पाटील यांच्या टीमनेही घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान तीन मुली धरणात बुडाल्याची माहिती मिळताच मृत मुलींच्या नातेवाईकांनी व करूळ ग्रामस्थांनी धरणाकडे धाव घेतली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांनी गर्दी केली होती.तर नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.
त्यानंतर तिन्ही मृतदेह ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे शिवविच्छेदनासाठी आणण्यात आले. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेतली.
मृत स्वरा ही आपल्या आई व मोठ्या बहिणीसह मुंबईवरून भोईरवाडी येथे आपल्या आजीच्या उत्तर कार्यासाठी आली होती. यादरम्यान नातीचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच मृत तन्वी माळकर ही यावर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेत चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाली होती. तर ऋतिका संतोष पाटील ही नुकतीच मुंबई येथे खाजगी नोकरीस लागली होती.