वैभववाडी : वैभववाडी नगरपंचायत नगराध्यक्षपदी भाजपच्या सौ. श्रद्धा रोहित रावराणे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी काम पाहिले. यावेळी न. पं. मुख्याधिकारी श्री. थोरात उपस्थित होते.
नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या श्रद्धा रावराणे यांचा एकमेव अर्ज दाखल होता. त्यामुळे फक्त निवडणुकीची औपचारिक घोषणा बाकी होती. स. 11 वा. निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांनी श्रद्धा रावराणे यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली. माजी नगराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, भाजप उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, जयेंद्र रावराणे, सज्जनकाका रावराणे, शांताराम रावराणे, बंड्या मांजरेकर, रवींद्र रावराणे, प्राची तावडे, रितेश सुतार, संतोष पवार, सुनील रावराणे, संजय चव्हाण, रत्नाकर कदम, दीपक गजोबार, वैभव रावराणे, नगरसेवक रणजित तावडे, रोहन रावराणे, डॉ. राजेंद्र पाताडे, प्रदीप रावराणे, विवेक रावराणे, अक्षता जैतापकर, मनोज सावंत, राजन तांबे, सुभाष रावराणे यांच्यासह सर्व नगरसेवक व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
पक्षाच्या धोरणानुसार माजी नगरध्यक्षा नेहा माईणकर यांनी काही दिवसापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लागली होती. नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला राखीव आहे. नगरपंचायतीत 17 पैकी 16 नगरसेवक भाजपचे आहेत. तर एक अपक्ष नगरसेवक आहे. भाजपचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे भाजपच्या श्रद्धा रावराणे यांचा एकमेव अर्ज नगराध्यक्ष दाखल झाला होता. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली होती. निवडीनंतर माजी नगराध्यक्षा नेहा माईणकर यांच्याकडून नूतन नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे यांनी पदभार स्वीकारला. यावेळी भाजपाच्यावतीने फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार घोषणाबाजी कारण्यात आली.
वाभवे-वैभववाडी नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान रवींद्र रावराणे यांना मिळाला होता. तर आता त्यांच्या सूनबाई सौ. श्रद्धा रावराणे यांना ही नगराध्यक्षपदी संधी मिळाली आहे. सासरे व सूनबाई या दोघांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.
माजी केंद्रीय मंत्री खा.नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांनी माझ्यावर विश्वास टाकून सोपवलेली जबाबदारी मी सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे पार पडण्याचा प्रयत्न करीन. वैभववाडी शहरातील प्रामुख्याने पाणीप्रश्न असेल किंवा इतर अन्य विकास कामे असतील, ती मार्गी लावण्यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करणार आहे.सौ. श्रद्धा रावराणे, नूतन नगराध्यक्षा, वैभववाडी