सावंतवाडी : उपवनसंरक्षकांच्‍या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना वैभव नाईक. सोबत उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी. 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News| ‘हत्ती हटाव’ मोहीम न राबवल्यास उग्र आंदोलन करू

उबाठा सेना जिल्हा प्रमुख आ.वैभव नाईक यांचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : हत्ती हटाव मोहिमेसंदर्भात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत जिल्हाप्रमुख माजी आ. वैभव नाईक यांनी गुरुवारी सावंतवाडी येथे उपवनसंरक्षक मिलीश दत्त शर्मा यांची भेट घेतली. दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात हत्तींकडून होणारा उपद्रव रोखण्यासाठी येणाऱ्या महिनाभरात हत्ती हटाव मोहीम राबविली नाही तर ठाकरे शिवसेना उग्र आंदोलन छेडेल, असा इशारा वैभव नाईक यांनी दिला.

या भेटी नंतर पत्रकारांशी बोलताना वैभव नाईक म्हणाले, गेले तीन- चार वर्षे दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यात हत्ती धुमाकूळ घालत आहेत. सत्ताधारी वारंवार हत्ती हटाव मोहीम राबविण्याची आश्वासने देत आहेत. परंतु आम्ही उपवनसंरक्षक यांच्याकडे चौकशी केली असता ‘हत्ती हटाव’ मोहीमेला कोर्टाने स्टे दिल्याचे त्यांनी सांगितले. परंतु आश्वासने देणाऱ्यांनी कोर्टाचा स्टे उठविण्यासाठी कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. काही दिवसांपूर्वी ओंकार हत्तीने मोर्ले येथे एका शेतकऱ्याचा बळी घेतला त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी महिन्याभराच्या आत त्या हत्तीला पकडण्याच्या आदेशाचे पत्र देऊन तशी ग्वाही दिली होती. परंतु त्याला दीड वर्ष झाले तरी हत्ती पकडला गेला नाही. हत्ती शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करीत आहेत. त्याचबरोबर ते लोकवस्तीत येत असल्याने पुन्हा मनुष्यहानीचा धोका आहे.

माणगाव मध्ये असेच हत्ती धुमाकूळ घालत असताना त्यावेळी आम्ही यशस्वीपणे हत्ती हटाव मोहीम राबविली होती. येणाऱ्या महिन्याभरात सावंतवाडी मतदारसंघात कोर्टाचा स्टे उठवून हत्ती हटाव मोहीम राबविली गेली नाही तर शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन केले जाणार आहे. हत्ती प्रश्नासाठी दोडामार्ग तालुक्यातील पाळये गावातील नागरिकांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. त्या उपोषणाला ठाकरे शिवसेनेचा पाठींबा असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले.

सावंतवाडी विधानसभाप्रमुख रुपेश राऊळ, विधानसभा संघटक बाळा गावडे, दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, सावंतवाडी तालुकाप्रमुख राजेश शेटकर, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, कुडाळ उपतालुकाप्रमुख बाळा पावसकर, दोडामार्ग शहरप्रमुख चंदन गावकर, कुडाळ शहर निरीक्षक सुशील चिंदरकर, दोडामार्ग युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे, उपतालुकाप्रमुख संदेश राणे, मणेरी विभागप्रमुख प्रदीप सावंत, सिद्धेश राणे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT