कणकवली : शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणार्यांना फटके देणार या खा. नारायण राणे यांच्या धमकीला माजी आ. वैभव नाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आधी मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण करा, चिपी विमानतळ सुरु करा नंतरच शक्तीपीठ महामार्गाच्या घोषणा करा,असा टोला वैभव नाईक यांनी नारायण राणेंना लगावला आहे. राणेंच्या धमक्यांना सिंधुदुर्गची जनता भीक घालणार नाही असेही त्यांनी सांगितले.
वैभव नाईक म्हणाले, नारायण राणे हे गेली साडेतीन वर्षे केंद्रीयमंत्री होते, आता लोकसभेचे खासदार आहेत. त्यांना मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण करता आला नाही. आम्ही सुरु केलेले चिपी विमानतळ त्यांच्या कार्यकाळात बंद पडले ते त्यांना सुरु करता आले नाही आणि ते शक्तीपीठ महामार्गाच्या गोष्टी करत आहेत. शिवाय त्याला विरोध करणार्यांना फटके देणार अशा धमक्या देत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकर्यांनी नेहमीच विकासाला योगदान दिले आहे.
मुंबई- गोवा महामार्गाला शेतकर्यांनी स्वतःहून जमिनी दिल्या. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्ग पूर्ण झाला,मात्र इतर जिल्ह्यात हा महामार्ग पूर्ण होऊ शकला नाही. केंद्रीय मंत्री असताना नारायण राणेंनी हा महामार्ग का पूर्ण करून घेतला नाही. चिपी विमानतळ सुरु करण्याच्या केवळ राणे घोषणा करीत आहेत आणि आता शक्तीपीठ महामार्गाच्या कामात ठेकेदाराकडून आर्थिक देवाण घेवाणीसाठी राणेंना शक्तीपीठ महामार्ग हवा असेल तर शेतकर्यांच्या विरोधाला आमचा पाठींबा असेल.
तुम्ही शेतकर्यांना आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला धमक्या देऊ नका. तुमच्या धमक्यांना सिंधुदुर्गची जनता भिक घालणार नाही. आम्ही विकासाच्या बाजूने आहोत. मात्र राणेंना मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण करता आला नाही, चिपी विमानतळ सुरु करता आले नाही, लोकसभा निवडणुकीत आश्वासन दिलेल्या सीवर्ल्ड प्रकल्पाचे काय झाले? त्यामुळे विकासावर बोलण्याचा राणेंना कुठलाही अधिकार नाही असे वैभव नाईक यांनी म्हटले आहे.