कणकवली : मोदी सरकारने बारा वर्षांत केलेले काम पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले परंतु या बारा वर्षांत मोदी सरकारने काय काय केले नाही ते देखील नितेश राणेंनी जनतेला सांगणे आवश्यक होते. मोदी सरकारचे १२ वर्षातील अपयश सांगण्यास पालकमंत्री विसरले असा टोला माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी लागवला.
माध्यमांशी बोलताना वैभव नाईक म्हणाले, गेल्या बारा वर्षात मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून मोदींनी दिलेले १५ लाखांचे आश्वासन, रुपयाची झालेली घसरण, गॅस,पेट्रोल, डिझेल आणि खतांची दरवाढ, शेती पिकाला मिळणारा तुटपुंजा हमीभाव,अपूर्ण असलेला मुंबई-गोवा हायवे, अपूर्ण असलेली जलजीवन मिशन योजना, गॅस सिलेंडरमध्ये कपात, अदानीच्या स्मार्ट मीटरची सक्ती या मुद्द्यांवरून सरकार अपयशी ठरल्याचे सांगत पाढा वाचला. ते म्हणाले, मोदी सरकारचे खरे अपयश पालकमंत्री नितेश राणेंनी कालच्या पत्रकार परिषदेत लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. बारा वर्षांपूर्वी जेव्हा मोदी सरकार सत्तेत आले तेव्हा पंधरा-पंधरा लाख रु. जनतेच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते त्याचे काय झाले. डॉलरच्या तुलनेत रुपयाची फार मोठी घसरण झाली आहे.१२ वर्षांपूर्वी पेट्रोल डिझेलचे दर ६० ते ७० रु. होते ते आता १०० ते ११३ रु. पर्यंत गेले आहेत. दोन कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन देखील मोदी सरकारने दिले होते. शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला हमीभाव देण्याचे आश्वासन देखील दिले होते त्याचे काय झाले हे सांगायला मात्र मंत्री नितेश राणे विसरले. अडीचशे रुपयाला मिळणाऱ्या खतांचे दर आता ८०० ते १४०० रु. पर्यंत गेले आहेत या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे. जल जीवन मिशन ही योजना मोदी सरकारने चार वर्षांपूर्वी आखली होती. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात या योजनेचे एकही नवीन काम पूर्ण झालेले नाही.
चिपी विमानतळावरून बंद असलेली चीपी ते मुंबई विमानसेवा मोदी सरकार सुरू करू शकले नाही. गेल्या बारा वर्षापासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम मोदी सरकार पूर्ण करू शकले नाही. शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या माध्यमातून विमा उतरवण्यास सांगितला जातो परंतु दरवर्षी विमा कंपन्यांना दहा हजार कोटींचा नफा होतो आणि सर्वसामान्य शेतकरी मात्र भरडला जातो. उज्वला गॅस योजनेच्या नावाखाली महिलांना वर्षाला १२ गॅस सिलेंडर देणार असे मोदी सरकारने सांगितले होते परंतु आता केवळ चार सिलेंडरच दिले जात आहेत. लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून दरमहा १५०० रु. देण्याचे आश्वासन दिले परंतु या योजनेतून ८५ लाख महिलांना वगळण्यात आले आहे. पेट्रोल डिझेलचे दर वाढल्याने सर्वच वस्तूंमध्ये महागाई वाढली आहे. या महागाईवर नियंत्रण ठेवण्यातही मोदी सरकार अपयशी ठरले आहे असा आरोप वैभव नाईक यांनी केला.
ते म्हणाले, जुन्या योजनांना असलेली महापुरुषांची नावे बदलून आपल्या नावाने मोदी सरकारने नवीन योजना सुरू केल्या परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली नाही त्यामुळे त्या योजना फेल गेल्या आहेत. स्मार्ट मीटर पासून सेतू सेवा केंद्र, मोठ्या कामांचे ठेके, औष्णिक आणि वीज प्रकल्प, शासकीय जमिनी हे सर्व अदानीच्या घशात घालण्यात आले आहे असा आरोप वैभव नाईक यांनी केला.