कुडाळ : चेंदवण येथील सिद्धिविनायक बिडवलकर खून प्रकरणी ठाकरे शिवसेनेचे माजी आ. वैभव नाईक हे आ. नीलेश राणे व राणे कुटुंबियांवर तसेच शिवसेना पक्षावर टीका करत आहेत, त्यांनी हे खोटे धंदे थांबवावेत. अन्यथा आम्ही सर्व कार्यकर्ते वैभव नाईक यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते माजी नगरसेवक राकेश कांदे यांनी दिला.
कुडाळ येथील महायुती कार्यालय सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत राकेश कांदे बोलत होते. माजी नगराध्यक्ष विनायक राणे, न.पं.गटनेते विलास कुडाळकर, नगरसेवक अभी गावडे, अॅड.राजीव कुडाळकर, गणेश भोगटे, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम, प्रसन्ना गंगावणे आदी उपस्थित होते.
कांदे म्हणाले, बिडवलकर खून प्रकरणी वैभव नाईक आ. नीलेश राणे यांच्यावर विनाकारण टीका करत आहेत. जनतेने केलेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याने ते विनाकारण राणे कुटुंबीयांवर टीका करत आहेत. त्यांनी या खून प्रकरणी केलेला राजकीय शो फेल ठरला आहे. त्यांनी आरोपी सिद्धेश शिरसाट याचे फोटो आ. राणेंसोबत व्हायरल केले, मग तोच सिद्धेश शिरसाट वर्षाचे 365 दिवस कुडाळमधील कुठल्या हॉटेलमध्ये बसायचा?, ते हॉटेल कुठल्या पक्षाच्या पदाधिकार्याचे आहे, हे नाईक यांनी जाहीर करावे. खरेतर त्या हॉटेलचे उद्घाटन वैभव नाईक यांच्या हस्ते झाले आहे, त्याचे फोटो आमच्याकडे आहेत.
या खून प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करावी,अशी मागणी स्वतः आ. राणे यांनी केली आहे. कुडाळ येथे श्रीराम मंदीर रॅली काढण्यात आली, त्यात असंख्य नागरिक सहभागी झाले होते, तेव्हा सिद्धेश शिरसाटची शिंदे सेनेत एन्ट्री झाली. मात्र आ.राणे तेव्हा भाजपात होते. त्यामुळे वैभव नाईक यांनी विनाकारण आ.राणेंची बदनामी करू नये, असे कांदे यांनी सांगितले.
केवळ सिद्धेश शिरसाट हा आ.राणेंसोबत फोटोत दिसतो म्हणून आ. राणेंवर नाहक आरोप करणे चुकीचे आहे. या खून प्रकरणात ज्या इम्रान शेखची गाडी घेण्यात आली होती, त्याच इम्रान शेख सोबत वैभव नाईक यांचाच कार्यकर्ता नेहमी असतो. गांजा प्रकरणात ताबीश नाईक नावाच्या त्यांच्याच कार्यकर्त्यावर केस चालू आहे. इम्रान शेख माजी खा. विनायक राऊत यांच्या सोबत एका कार्यक्रमात उपस्थित असल्याचे फोटो आहेत. तसेच त्यांच्या एका पदाधिकार्यावर सावंतवाडी तहसीलदारांनी बेकायदेशीर वाळू वाहतूक प्रकरणी दंडात्मक कारवाई केली आहे. मग या सर्व लोकाचे तुम्ही ‘आका’ आहात, असे आम्ही समजायचे काय? असा सवाल कांदे यांनी केला आहे