साटेली भेडशी : त्या इमारतीजवळ लावण्यात आलेला पोलिस बंदोबस्त. pudhari photo
सिंधुदुर्ग

अनधिकृत मदरशामध्ये शस्त्रे जप्त; दोघाजणांवर गुन्हा

Weapons seized madrasa: साटेली भेडशीत तहसीलदार कचेरीत ठिय्यानंतर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग ः साटेली भेडशी (थोरले भरड) येथे एका अनधिकृत इमारतीत बेकायदेशीररीत्या शस्त्र व मकतब चालू असून, त्या ठिकाणी सात ते दहा वयोगटातील मुलांना उर्दू व अरबी शिक्षण देत असल्याची तक्रार करत कारवाईच्या मागणीसाठी सोमवारी दोडामार्गवासीयांनी तहसीलदार कचेरीत ठिय्या मांडला. त्याशिवाय निदर्शनास आणून दिले. त्यानुसार तेथे धाड घालून दोन तलवारी जप्त केल्या. याप्रकरणी दोन संशयित युवकांना ताब्यात घेतले आहे. बिलाल आलम शेख (38, मूळ रा. बिहार) व असलम इस्माईल खेडेकर (44, रा. साटेली भेडशी) अशी त्यांची नावे असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल आल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली.

साटेली भेडशी (थोरले भरड) येथे एका अनधिकृतरित्या बांधकाम करण्यात आलेल्या घरात काही दिवसांपूर्वी येथील ग्रामस्थांना संशयास्पद हालचाली दिसून आल्या होत्या. त्यानुसार ग्रामस्थांनी याचा छडा लावला असता, शस्त्र प्रशिक्षण व मकतब चालू असून सात ते दहा वयोगटातील मुलांना उर्दू व अरबीचे शिक्षण दिले जात असल्याचे समजताच हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी, स्थानिक ग्रामस्थांनी तसेच स्थानिक मुस्लिम बांधवांनी हा प्रकार रविवारी सायंकाळी दोडामार्ग पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानुसार पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे व अन्य सहकारी कर्मचार्‍यांनी कायदेशीररित्या त्या घराची झडती घेतली. या झडतीत अवैधरित्या घरात ठेवलेल्या दोन तलवारी जप्त केल्या.

तसेच घरामध्ये मकतब चालू असून त्या ठिकाणी सात ते दहा वयोगटातील मुलांना उर्दू व अरबीचे शिक्षण देत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी त्या घरात उपस्थित असलेल्या अस्लम इस्माईल खेडेकर व बिलाल आलम शेख या दोघांनाही ताब्यात घेतले. या दोघांवरही दोडामार्ग पोलिसांनी आर्म्स अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिस निरीक्षक यांनी सांगितले. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भगत करत आहेत. तसेच त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तहसीलदारांना घेराओ

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता दोडामार्गवासीयांनी सोमवारी दोडामार्ग तहसील कार्यालयाला धडक दिली. त्यानंतर तहसीलदारांच्या दालनात ठिय्या मांडला. सुमारे दीडशे ते दोनशे जणांचा जमाव यावेळी उपस्थित होता. दोडामार्ग तालुक्यात अवैधरित्या चालू असलेल्या अशा घटना या भयानक आहेत. भविष्यात आमच्या जीवितास धोका निर्माण होणार्‍या अशा प्रकारांना प्रशासनाने आळा घातला पाहिजे. ग्रामपंचायतीकडून बांधकाम परवानगी न घेता ही इमारत उभारण्यात आलेली आहे. ही इमारत संबंधित मालकाकडून भाडेतत्त्वावर घेतली असून त्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे.

एका संस्थेच्या नावाने हे घर भाडेतत्त्वावर घेण्यात आलेले आहे. सामाजिक संस्था म्हणून देखावा करून त्यामागे वेगळ्या प्रकारचे कारनामे केले जात आहेत, असा संशय व्यक्त करत जमावाने संस्था अध्यक्ष व सदस्य यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे अशी मागणी लावून धरली. जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार नाही तोपर्यंत तहसीलदार दालनातून आम्ही उठणार नाही असा पवित्रा उपस्थित जमावाने घेतला.

या जमावात काही स्थानिक मुस्लिम बांधव देखील सामील होते. स्थानिक मुस्लिम बांधवांनी देखील या प्रकाराचा निषेध करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांच्याकडे केली. प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दोडामार्ग तहसील कार्यालयात उपस्थित राहून सर्व प्रकाराची पडताळणी केली आणि, कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदार यांना दिल्या.

पोलिस खात्याकडून झालेली कारवाई ही कृषिकेश रावले, प्रभारी पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग, विनोद कांबळे, उप विभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी यांचे मार्गदर्शनाखाली दोडामार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. हेमचंद्र खोपडे, पोलीस अंमलदार, पोहेको रामचंद्र मळगावकर, विठोबा सावंत, वसंत देसाई, रामचंद्र साटेलकर, मपोकों/कविता धर्णे यांनी केलेली आहे.

विरोधच राहील ः इस्माईल चांद

आम्ही स्थानिक मुसलमान व हिंदू बांधव एकोप्याने नांदत आहोत. बाहेरून आलेल्या या मुसलमानांना आमचा कायमच विरोध राहणार आहे. यापूर्वी देखील आम्ही त्यांना विरोध केला आहे. मात्र, आमच्या या विरोधाला ते जुमानत नाहीत. आम्ही आजपर्यंत हिंदू बांधवांसोबतच खेळलो, बागडलो, वाढलो, लहानाचे मोठे झालो. त्यांच्या धार्मिक सणात देखील आमचा सहभाग असतो. बाहेरून आलेल्या या मुसलमानांमुळे आम्ही स्थानिक मुसलमान भरडलो जात आहे. अशी कृत्य करणार्‍या या बाहेरील मुसलमानांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी साटेली भेडशी ग्रामपंचायत सदस्य इस्माईल चांद यांनी तहसीलदार यांच्याकडे केली.

तहसीलदारांनी केली कारवाई

साटेली-भेडशी सरपंच यांनी त्या ठिकाणी सुरू असलेल्या पाण्याचे कनेक्शन तात्काळ बंद करणेत यावे. महाराष्ट्र विद्युत महामंडळ, दोडामार्ग यांनी त्या घरातील वीज जोडणी तात्काळ बंद करून तसा अहवाल या कार्यालयाकडे सादर करावा. पोलिस निरीक्षक यांनी त्या घराचा ताबा घेउन कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यात यावी. तसेच आवश्यक तो पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवण्यात यावा असा आदेश तहसीलदारांनी पारित केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT