सिंधुदुर्ग मत्स्य विभागाकडून ताब्यात घेतलेली नौका व खलाशी. pudhari photo
सिंधुदुर्ग

अनधिकृत मासेमारी करणारी परप्रांतीय नौका ताब्यात

fishing boat seized: मत्स्य व्यवसाय विभागाची मुणगे समुद्रात कारवाई

पुढारी वृत्तसेवा

देवगड/मालवण ः मुणगे समुद्रात सुमारे 18 वाव खोल पाण्यात अनधिकृत मासेमारी करणार्‍या ‘श्री महालक्ष्मी- 3’ या परप्रांतीय नौकेवर सोमवारी रात्री 11.39 वा. च्या सुमारास कारवाई करण्यात आली. मत्स्य व्यवसाय विभागाच्या अंमलबजावणी अधिकारी तथा सहायक मत्स्य विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर यांच्या पथकाने मालवण पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. या नौकेवर तांडेलासह एकूण सात खलाशी होते. मत्स्य व्यवसाय विभागाने ही नौका ताब्यात घेऊन ती कारवाईसाठी मालवण-सर्जेकोट बंदरात ठेवली आहे.

सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी श्रीमती करंगुटकर या पथकासमवेत समुद्रात नियमित गस्त घालत असताना कर्नाटक राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली नौका अनधिकृतरित्या मासेमारी करताना आढळून आली. ही नौका श्रीमती वेदवती स. पुथरण (रा. मारीकंबा नगर , उडपी-कर्नाटक) यांच्या मालकीची असल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाले. अनधिकृत मासेमारी केल्याप्रकरणी महाराष्ट्र सागरी मासेमारी (नियमन) अधिनियम 1981 व सुधारणा अधिनियम 2021 अंतर्गत या नौकेवर जप्तीची कारवाई करण्यात आली.

ही कारवाई मालवण पोलीस ठाण्याचे कर्मचारी अमित हरमलकर, सागरी सुरक्षा पर्यवेक्षक मालवण व देवगड यांच्या सहकार्याने, सहा.आयुक्त मत्स्य व्यवसाय-सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली केली. या नौकेवर सुमारे 30 ते 35 हजार रु. किंमतीची मासळी आढळली असून तिचा लिलाव करून नौकेवर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. कारवाईचे प्रतिवेदन अंमलबजावणी अधिकारी श्रीमती करंगुटकर यांनी दाखल केले असून सुनावणी सहा. आयुक्त मत्स्य व्यवसाय- सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT