कणकवली : कुंभवडे-गावठणवाडी येथील सतीश कृष्णा सावंत(32) याने मंगळवारी सायंकाळी उंदीर मारण्याचे औषध प्राशन केल्याने तो अत्यवस्थ झाला होता. त्याला उपचारासाठी प्रथम कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणि तेथुन सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मंगळवारी रात्री 10.37 वा.च्या सुमारास मयत घोषित केले. त्याच्या आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच त्याने आपले जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
सतीश हा आई-वडिलांसह राहत असे. अलीकडे त्याची मानसिक स्थिती बिघडली होती. त्याने मंगळवारी सकाळी 9 वा.च्या सुमारास उंदीर मारण्यासाठीचे औषध असलेली ट्यूब पाण्यात मिक्स करुन प्राशन केली. त्याचा त्रास होवू लागल्याने मंगळवारी दुपारी तो कनेडी येथील खाजगी डॉक्टरकडे उपचारासाठी गेला होता. मात्र डॉक्टरला त्याने विषारी औषध प्राशन केल्याचे न सांगता डोकेदुखीचा त्रास होत असल्याचे सांगितले. त्यांनी दिलेली औषधे घेवून तो कुंभवडे येथील घरी गेला. दुपारनंतर अधिक त्रास होवू लागल्याने सायंकाळी 4 वा.च्या सुमारास तो कनेडी येथील दुसर्या डॉक्टरांकडे उपचारासाठी गेला. त्या डॉक्टरांनाही त्याने आपण विषारी औषध घेतल्याचे सांगितले नाही. त्यांची औषधे घेवून तो सायंकाळी पुन्हा कुंभवडे येथे घरी गेला. घरी गेल्यानंतर सायंकाळी 7 वा.च्या सुमारास त्याची प्रकृती अत्यवस्थ बनल्याने त्याला उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथून अधिक उपचारासाठी सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचे निधन झाले.
त्याच्यावर बुधवारी दुपारी कुंभवडेतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सतीश याचा बुधवारी 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. मात्र त्याच्या एक दिवस अगोदरच त्याने आपला जीवन प्रवास संपविल्याने कुंभवडे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात आई, वडिल, भाऊ असा परिवार आहे. याबाबतची खबर त्याचा भाऊ सुशील सावंत याने कणकवली पोलिसांत दिली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
सावंतवाडी -होळीचा खुंट जुना बाजार येथील राजेश शिवाजी पांगम (48) यांनी राहत्या घरात सीलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी रात्री उशिरा उघडकीस आला याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. राजेश पांगम हे गेली वर्षापासून दुर्धर आजाराने ग्रस्त होते, त्यांच्यावर गोवा -बांबोळी व कोल्हापूर येथे उपचार सुरू होते. ते एक-दोन दिवस झोपून राहायचे. मंगळवारी सायंकाळी घरच्यांनी त्यांना जेवणासाठी हाक मारली असता त्यांनी दरवाजा उघडला नाही, तसेच आतून काही प्रतिसाद आला नाही. म्हणून दरवाजा तोडून आत पाहिले असता ते आतील सिलिंग फॅनला ओढणीच्या साह्याने गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आले. याबाबत त्यांचा मुलगा जय पांगम याने पोलिसांना कल्पना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. यासंदर्भात पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे, हवालदार अनिल धुरी, मंगेश शिंगाडे यांनी भेट दिली.