मालवण : मालवण शहरातील मेढा येथे लोखंडी वीज खांबाचा शॉक लागून दोन गायींचा दुर्दैवी जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी स. ७ वा. च्या सुमारास घडली. या घटनेमुळे महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे.
गुरुवारी सकाळी मेढा शंकर मंदिरनजीकच्या रस्त्यावरील वीज खांबाजवळून दोन गायी जात होत्या. दुदैवाने सदर पोलामध्ये विद्युत प्रवाह उतरला होता. या पोलला गायींचा स्पर्श झाल्याने दोन्ही गायींचा जागीच मृत्यू झाला. यातील एक गाय गाभण होती. स्थानिक नागरिकांनी याबाबत नगरसेविका मेघा सावंत यांना माहिती दिली.
मेघा सावंत यांनी घटनास्थळी जात महावितरणला याबाबत माहिती दिल्यावर त्या भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. वीज कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. नगरसेविका मेघा सावंत यांनी या मृत गायींच्या मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र कोणीही मालक सापडून आला नाही. त्यामुळे नगरसेविका मेघा सावंत यांनी नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण आणि वीज अभियंता यांना कल्पना देत मृत गायींना दफन करण्याबाबत संमती घेतली. नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी गायींचे मृतदेह ट्रॅक्टरमध्ये भरून दफन करण्यासाठी नेले.