आंबोली वनपरिक्षेत्रात १२ पट्टेरी वाघ! 
सिंधुदुर्ग

Tiger News : आंबोली वनपरिक्षेत्रात १२ पट्टेरी वाघ!

वन्यजीव सर्वेक्षणातून माहिती समोर

पुढारी वृत्तसेवा

निर्णय राऊत

आंबोली : देशातील पश्चिम घाटातील जैवविधिधतेचा सर्वात समृद्ध हॉट स्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली वनक्षेत्रात नेहमीच दुर्मिळ ते अतिदुर्मिळ वन्यजीव व वनस्पती आदी हे सहज आढळून येतात, त्यांचा सुरक्षित असा अधिवास हा आंबोली वनपरिक्षेत्र असल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. २०२५ -२६ च्या मधे विस्तृत आंबोली वनपरिक्षेत्रात सुमारे १२ वाघ असल्याचे माहिती एका वन्यजीव सर्वेक्षणातून समोर आली आहे. तर सदर वाघांची संख्या अधिक सुद्धा असू शकते. तसेच आंबोली - चौकुळ - गेळे भागात आठवड्याला २ ते ३ पाळीव जनावारांची शिकार होते. यावरून सदर परिसरात वाघ व बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे संकेत आहेत.

आंबोली–दोडामार्ग संवर्धन राखीव क्षेत्र हे जगातील जैवविविधतेच्या दृष्टीने सर्वात सुरक्षित अधिवासासह अतिसंवेदनशील वनक्षेत्र आहे. तर कोणत्याही जंगलात वाघाचा अधिवास हा त्या वनपरिक्षेत्राच्या जैवविविधतेसाठी खूप महत्त्वाचा समजला जातो. कारण वाघ हे शीर्ष शिकारी आहेत. यामुळे वाघ त्यांच्या अधिवासातील जैवविविधतेसाठी महत्त्वाचे आहेत. ते इतर प्राण्यांवर नियंत्रण ठेवतात आणि त्यांना नैसर्गिकरित्या जगण्यासाठी मदत करतात. त्यामुळे त्यांच्या अधिवासातील जैवविविधता टिकून राहते. सोबत वाघाचा अधिवास असलेल्या ठिकाणी त्यांना सुरक्षित वातावरण मिळते आणि शिकार करण्यासाठी पुरेसे अन्‍न उपलब्ध होते. आंबोली सारख्या पश्चिम घाटातील जैवविधिधतेच्या जंगलात वाघांचा वावर निदर्शनास येत असल्याने आंबोलीची जैवविविधता पूर्णतः समृद्ध असलेल्याचे अधोरेखीत होत आहे.

आंबोली वनपरिक्षेत्र हे आंबोली, चौकुळ व नेनेवाडी, केगद, गेळे, मसुरे, फणसवडे, केसरी, पारपोली आदी गावांत पसरलेले आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी त्या - त्या गावांतील ग्रामस्थांनी वन्यजीवांचे पूर्वीपासूनच अधिवास हे संवर्धन केले असल्याने दरवर्षी दुर्र्मीळ व अतिदुर्मीळ तथा नवे वन्यजीव, वनस्पती आदी सहज आढळून येतात. अद्याप जंगली प्राणी आणि मनुष्य असा संघर्ष येथे नसल्याने वन्यजीव बहरत आहेत. सद्या आंबोली वन'परिसरात पट्टेरी वाघ, बिबटे (अगदी ब्लॅक पँथर सुद्धा), रानगवे, सांबर, भेकर, अस्वल, रानडुक्कर, रानमांजरे, रानकुत्रे, कोल्हे, ससे, नीलगाय, हत्ती आदी अनेक प्रजातीचे विविध जंगली प्राणी तसेच शेकडो प्रजातीचे विविध पक्षी हेही आढळून येतात. सोबत असंख्य वनस्पती यांच्यासह जैवविविधतेतील महत्वाचे घटक असलेले दुर्मिळ ते अतिदुर्मीळसह अनेक प्रजातीचे वन्यजीव, कीटक ही सहज आढळतात. त्यामुळे आंबोलीचे जंगल हे जैवविविधतेने परिपूर्ण असल्याचीही ओळख आहे.

दरम्यान, पट्टेरी वाघांसाठी आंबोली–दोडामार्ग संवर्धन राखीव वनक्षेत्र हे अतिशय सुरक्षित अधिवास असून आंबोली वनक्षेत्रात वाघांना शिकार पर्याप्त उपलब्ध असल्याने वाघांच्या संख्येत नेहमीच वाढ होत आहे. सद्या १२ वाघांचे वास्तव्य जरी स्पष्ट होत असले तरी वाघांची संख्या त्याहून अधिक असेल, तसेच येत्या ५ वर्षात आंबोलीत वनक्षेत्रात सुमारे ३० हून अधिक वाघांचा अधिवास समोर येईल, असेही वन्यजीव अभ्यासकांचा अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT