आंबोली ः आंबोली परिसरात शनिवारी संध्याकाळी भरवस्तीत हत्ती आल्याने एकच धावपळ उडाली. तर कुटुंबापासून चुकलेला सुमारे 4 वर्षाचा हा टस्कर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भरवस्तीत आलेल्या या हत्तीला पहाण्यासाठी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. अनेकांनी त्या हत्तीला कॅमेराबद्ध केले.
आंबोली परिसरात नेहमी टस्कर हत्तीकडून शेतीचे मोठे नुकसान केले जाते. तर आंबोलीतील- नांगरतासवाडी व गडदुवाडी परिसरासह घाटकरवाडी धरण परिसरात दरवर्षी काही दिवसांसाठी हा टस्कर स्थिरावतो. मात्र, यंदा प्रथमच 3 ते 4 वर्षाचा एक कुटुंबापासून चुकलेला किंवा कुटुंबाने बाहेर काढलेला टस्कर हत्ती आंबोलीत दाखल झाला असून तो आपल्या कुटुंबाला सैरावैरा अवस्थेत शोधात असल्याचे चित्र आहे. हा हत्ती गेला आठवडाभर चंदगड तालुक्यातील कानूर - पुंद्रे परिसरात माघारी जाण्याचा मार्ग शोधत होते. मात्र, मार्ग न सापडल्याने तो फाटकवाडी धरण परिसरातून आंबोलीत दाखल झाला.
हा टस्कर हत्ती कुटुंबाला शोधात असून पूर्णतः घाबरलेले आहे. मात्र, असे असले तरी अद्यापही या हत्तीने शेतीचे व अन्य कोणतेही मोठे नुकसान केलेले नाही. चंदगड तसेच दोडामार्ग सिमेवरील वीजघर, मोर्ले, भेकुर्ली, पारगड आदी गावांमधे स्थिरावलेल्या हत्तींच्या कळपातील हा हत्ती असल्याची व त्याची कुटुंबापासून ताटातूट झाल्याची किंवा कळपाने त्याला बाहेर काढल्याची शक्यता काही जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत.