आडेली : साईचे तांदूळ हळदीत वलया...साईचे तांदूळ .... होकलेच्या आवशिक गे....मानान बोलया... होकलेच्या आवशिक गे....हळद चढवक बोलया....होकलेच्या बापाशीक गे...मानान बोलया.... या ओव्यांच्या सुरांनी लग्न घरातील वातावरण मंगलमय व प्रसन्न होऊन जाते. तुळशी विवाहनंतर विवाह इच्छुक वधू-वरांच्या लगीनघाईला सुरुवात होणारअसून या ओव्यांचे सूर वाडीवार ऐकायला मिळणार आहेत. 3 नोव्हेंबर पासून 11 जुलै 2026 पर्यंत विवाहासाठी सुमारे 72 बक्कळ मुहूर्त असल्याने दोनाचे चार हात करण्याची संधी मिळणार आहे.
दीपावली झाली. आता कार्तिकी एकादशी आणि त्यानंतर त्रिपुरारी पौर्णिमे पर्यंत तुळशीविवाहाची धामधूम रंगात येईल. तुळशी विवाहनंतर ग्रामीण भागात वधू-वरांच्या लग्नघटिका जवळ येऊ लागतील. 3 नोव्हेंबर पासून विवाह मुहूर्तांचा धूमधडाका सुरू होणार आहे. तुळशी विवाहनंतर लग्नसरायची धावपळ सुरु होते. या निमित्त वर आणि वधूसाठी आवश्यक खरेदीला वेग येईल. लग्नाचा बस्ता बांधायची लगबग सुरू होईल. विवाह सोहळ्यानिमित्ताने लहान मोठ्या व्यवसायांना सुगीचे दिवस येतात. मंगल कार्यालय, कापड दुकाने, सोन्या चांदीची दुकाने, किराणा व्यवसाय, भाजीपाला आदी विविध व्यवसायाच्या दुकानात खरेदीची लगबग वाढून सगळीकडे उत्साहाचे वातावरण पसरते.
यंदा 3 नोव्हेंबर पासून 11 जुलै2026 पर्यंत विवाहाचे मुहूर्त आहेत. नोव्हेंब मध्ये 12 तर फेब्रुवारी 2026 मध्ये सर्वाधिक 12 मुहूर्त आहेत. सर्वातकमी डिसेंबर 2025 मध्ये 6 मुहूर्त आहेत. याशिवाय वेगवेगळ्या पंचांगानुसार विवाह मुहूर्तही आहेत. तसेच यजमानांच्या सोयीनुसार पुरोहित काढीव मुहूर्त काढून देत असल्याने आणखी काही दिवस विवाह सोहळे रंगणार आहेत.
विवाह मुहूर्त....
नोव्हेंबर- दिनांक-3,4,7,13,15,16,22,23, 25,26,27,30
डिसेंबर- दिनांक-2,5,12,13,15,16,
जानेवारी 2026- दिनांक-20,23,24,25,26,28,29
फेब्रुवारी 2026- दिनांक-3,5,6,7,8,10,11,12,20,22,26,28
मार्च -2026- दिनांक-5,7,8,12,14,15,16
एप्रिल -2026-दिनांक- 21,26,28,29,30
मे-2026- दिनांक -1,3,6,7,8,9,10,13,14,
जून-2026- दिनांक -19,20,22,23,24,27,
जुलै -2026- दिनांक-1,2,3,4,7,8,9,11