कनेडी फोंडा राज्यमार्ग क्रमांक 181 रस्ता दुतर्फा भर उन्हात सुक्या जमिनीत झाडं लावताना कामगार.  ( छाया ः अविनाश रासम)
सिंधुदुर्ग

36 अंश डिग्री तापमानात कुणी झाडं लावतं का..?

होय..! कनेडी-फोंडा मार्गावर सा.बां. विभागाचा प्रताप : ग्रामस्थ आक्रमक; ठेकेदाराचा काढता पाय

पुढारी वृत्तसेवा

हरकुळखुर्द ः अविनाश रासम

रणरणत्या उन्हात तेही 36 अंश डिग्री तापमानात कुणी झाडं लावतं का? या प्रश्नाचे उत्तर नाही असंच असलं तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या अकलेचे तारे तोडत भर उन्हात रस्ता दुतर्फा चुकीच्या पद्धतीने झाडं लावण्याची मोहीम सुरू केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराकडून सुरु असलेल्या या प्रकाराला हरकुळखुर्द ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत संबधीत ठेकेदाराला धारेवर धरले.तरीही हा ठेकेदार आपलं तेच खरं म्हणत असताना ग्रामस्थांचा पारा आणखीच चढला.अखेर ग्रामस्थांनी संबधीत खात्याच्या अधिका-यांना येथे बोलवून घ्या म्हणत आक्रमक रुप धारण केल्यानंतर त्या ठेकेदाराने तेथून काढता पाय घेतला. शासनाच्या पैशाचा सार्वजनिक बांधकाम विभाग अपव्यय का करत आहे? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

गेले पंधरा दिवस कनेडी-फोंडा राज्यमार्ग क्रमांक 181 दुतर्फा झाडे लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराने खड्डे मारण्यास सुरुवात केली.त्यावेळी सुद्धा ग्रामपंचायत अगर येथील शेतकर्‍यांना विचारात न घेता ठेकेदाराने मशीनच्या सहाय्याने खड्डे मारुन ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याचा पाईप फोडत, तसेच शेतकर्‍यांचे नुकसान करत खड्डे मारुन पूर्ण केले. मंगळवारी चक्क भर दुपारी ठेकेदाराने कामगारांकरवी रणरणत्या उन्हात झाडं लावण्यास सुरुवात केली. ग्रामस्थांच्या हा प्रकार निदर्शनास येताच ग्रामस्थांनी याला तीव्र विरोध केला. सदर ठेकेदार मात्र झाडं जगो अथवा मरो,आम्ही झाडं लावणार म्हणत ग्रामस्थांनाच धमकावण्याचा प्रयत्न करत होता. तर ग्रामस्थ आम्ही तीव्र उन्हात झाडांची हत्या करु देणार नाही, तुम्ही सार्वजनिक बांधकामच्या अधिकार्‍यांना बोलवा असे सांगत होते.अखेर आपले तेच खरं म्हणणा-या ठेकेरासमोर ग्रामस्थांनी उग्र रुप धारण करताच ठेकेदार व त्याच्या कामगार मंडळींनी तेथून काढता पाय घेतला.

36 अंश डिग्री तापमानात सा.बां.ने कसा काय ठेका दिला?

सध्या तीव्र उन्हाच्या झळा बसत असून 36अंश डिग्री तापमान आहे. असे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारास झाडे लावण्याचा कसा काय ठेका दिला? असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.याबाबत तीव्र नाराजीही व्यक्त केली जात आहे. याबाबत बोलताना माजी उपसरपंच संजय रावले म्हणाले, आमचा झाडं लावण्यास विरोध नाही.मात्र ही झाडे ग्रामपंचायत, शेतकरी यांना विश्वासात घेत जूनमध्ये लावा. वाटल्यास हरकुळखुर्द हद्दीतील झाडं जगवण्याची जबाबदारी आम्ही घेवू. पण झाडं भर ऊन्हात लावून त्यांची हत्या करू नका, असे आम्हा ग्रामस्थांचे म्हणणे असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT