सावंतवाडी : सावंतवाडी-रेडी मार्गावरील न्हावेली गावात दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास एक मोठे झाड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मात्र, प्रशासकीय अधिकार्यांची मदत येण्यापूर्वीच न्हावेलीचे उपसरपंच तथा शिवसेना उपतालुकाप्रमुख अक्षय पार्सेकर आणि गावकर्यांनी एकत्र येत तत्काळ रस्त्यावरील झाड हटवून वाहतूक सुरळीत केली.
मिळालेल्या माहितीनुसार, न्हावेली-चौकेकरवाडी येथे जोरदार वार्यामुळे रस्त्याच्या मधोमध एक धोकादायक झाड कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. परंतु, रस्त्यावर झाड पडल्यामुळे वाहतूक पूर्णपणे थांबली होती.
मुसळधार पाऊस सुरू असतानाही न्हावेलीतील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्यासह विठ्ठल परब, दीपक पार्सेकर, अनिकेत धवण, पिंटो धाऊसकर, सरपंच अष्टविनायक धाऊसकर, सुनील धाऊसकर आणि संदीप धवण यांनी कटरच्या साहाय्याने झाड कापून बाजूला केले. यामुळे रस्त्यावरील वाहतूक पुन्हा सुरू झाली आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.
न्हावेली गावात रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक धोकादायक झाडे उभी आहेत. या संदर्भात वारंवार मागणी करूनही संबंधित अधिकार्यांकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. जर अधिकार्यांनी वेळेत लक्ष दिले असते, तर नागरिकांना असा त्रास सहन करावा लागला नसता, भविष्यात अशी आणखी झाडे कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे.अक्षय पार्सेकर,उपसरपंच- न्हावेली ग्रा. पं.