महादेवगड पॉईंटवरून गेला होता तोल
पर्यटक जत्राट-निपाणी येथील रहिवासी
आंबोलीत वर्षा पर्यटनाला आले असता घडली दुर्घटना
आंबोली : पुढारी वृत्तसेवा
वर्षा पर्यटनासाठी जत्राट-निपाणी (जि. बेळगाव) येथून मित्रांसोबत आंबोलीत आलेले पर्यटक डॉ. आयूब खान अब्बास सय्यद (वय ४६) हे मंगळवारी सायंकाळी महादेवगड पॉईंटच्या दरीत कोसळले होते. बुधवारी आंबोली रेस्क्यू टीमने सलग ५ तास खडतर मोहीम राबवून सुमारे ८०० फूट खोल दरीतून त्यांचा मृतदेह बाहेर काढला. या दुर्दैवी घटनेमुळे सय्यद कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
डॉ. आयूब खान यांचा निपाणी-जत्राट येथे दवाखाना आहे. मंगळवारी दुपारी ते आपल्या अन्य ९ मित्रांसोबत आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी आले होते. मुख्य धबधब्याला भेट दिल्यानंतर सायंकाळी ५ वाच्या सुमारास सर्वजण महादेवगड पॉईंटवर गेले.
याचदरम्यान डॉ. सय्यद हे सुरक्षा कठडा ओलांडून फोटो काढण्यासाठी पुढे गेले असता, अचानक त्यांचा तोल गेला आणि ते थेट दरीत कोसळले. तिथे मक्याची कणसे विकणाऱ्या एका स्थानिक विक्रेत्याने त्यांना दरीत कोसळताना पाहिले आणि तत्काळ त्यांच्या मित्रांना याची माहिती दिली. घटनास्थळी त्यांचे चप्पल आणि मोबाईल आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिस आणि आंबोली रेस्क्यू टीमने मंगळवारी रात्रीच शोधमोहीम सुरू केली होती; मात्र घनदाट धुके आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ती थांबवावी लागली. बुधवारी सकाळी ७ वाजता रेस्क्यू टीमच्या दोन पथकांनी पुन्हा मोहीम सुरू केली. सकाळी साडेआठच्या सुमारास एका पथकाला सिद्धेश्वर मंदिराजवळील झाडांमध्ये सुमारे ८०० फूट खोलीवर डॉ. सय्यद यांचा मृतदेह आढळून आला.
सावंतवाडी येथे विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. या शोधमोहिमेत सह्याद्री ॲडव्हेंचर आणि आंबोली-सांगली रेस्क्यू टीममधील सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू टीमच्या बाबल अल्मेडा, मायकल डिसोजा, संतान संतान अल्मेडा, अजित व उत्तम नार्वेकर, गेळे सरपंच सागर ढोकरे, लॉरेन्स अल्मेडा, राजू राऊळ, प्रथमेश गावडे, पासकु देसा, अजित नार्वेकर, समीर गावडे, आनंद गावडे या सदस्यांनी मोलाची कामगिरी बजावली.