वैभववाडी ः सध्याचा काळ हा पक्षासाठी जरी संघर्षाचा असला तरी येणारा काळ हा आपलाच असणार आहे. जिल्ह्यातील वाढत चाललेली राजकीय दहशत मोडून काढण्यासाठी आपल्याला संघर्ष करत राहावे लागेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व आम्ही सर्व नेते मंडळी कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम आहोत. कोणीही डगमगून जाऊ नये, अशी ग्वाही माजी खा. विनायक राऊत यांनी दिली.
वैभववाडी येथील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी संवाद साधताना राऊत बोलत होते. जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, युवासेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर, जि. प. माजी सदस्य दिव्या पाचकुडे, गुलझार काझी आदी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कोल्हापूर-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले, लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर कणकवली विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेताना असे जाणवले की बरेच पदाधिकारी स्वतः च्या फायद्यासाठी पक्ष सोडून गेले असतील तरी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक अजून उद्धव ठाकरेंसोबत आहे.
गावागावात बरीच विकासकामे अडकून पडली आहेत, येणार्या काळात आपण शिवसेनेच्या माध्यमातून ही विकासकामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असा शब्द त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक म्हणाले, आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहून, सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेल्या गुंडगिरी प्रवृतीला रोखण्यासाठी आपण यांच्याविरुद्ध आवाज उठवून होणार्या अन्यायाविरुद्ध लढले पाहिजे. आपल्याला यश नक्की मिळेल असे नाईक म्हणाले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद या आढावा बैठकीस मिळाला.