कणकवलीत उत्स्फूर्त प्रतिसादात तिरंगा यात्रा 
सिंधुदुर्ग

कणकवलीत उत्स्फूर्त प्रतिसादात तिरंगा यात्रा

भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ यात्रा; पालकमंत्री नीतेश राणे यांचे नेतृत्व

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : भारतीय सैन्यदलाचे मनोबल वाढविण्यासाठी आणि सैन्यदलाप्रति अभिमान व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी कणकवलीत पालकमंत्री नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली पटकीदेवी मंदिर ते तहसील कार्यालयापर्यंत तिरंगा यात्रा काढण्यात आली. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘भारतीय सैन्यदलाचा विजय असो’ अशा घोषणा देत हातात तिरंगे झेंडे घेऊन काढलेल्या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या यात्रेमुळे कणकवली तिरंगामय झाली होती.

काश्मीर-पहलगाम हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांसह पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून चोख प्रत्युत्तर दिले. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी कणकवलीत देशाच्या सुरक्षेसाठी लढणार्‍या भारतीय सैनिकांसाठी तिरंगा यात्रा काढण्यात आली. पटकीदेवी मंदिर येथे यात्रेला प्रारंभ झाला. यात्रेत पालकमंत्री नीतेश राणे हे स्वतः तिरंगा हातात घेऊन सहभागी झाले होते.

त्यांच्या समवेत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आ. अजित गोगटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा उपाध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत, कणकवली विधानसभाप्रमुख मनोज रावराणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, प्रज्ञा ढवण, सुजाता हळदिवे, सुप्रिया नलावडे, समीर सावंत, रंजन चिके, कणकवली तालुका व्यापारी संघ अध्यक्ष दीपक बेलवलकर, अ‍ॅड. उमेश सावंत, अ‍ॅड. राजेश परुळेकर, डॉ. संदीप नाटेकर, पेन्शनर्स संघटनेचे अध्यक्ष दादा कुडतरकर, संजय मालंडकर, बबलू सावंत, अण्णा कोदे, राष्ट्रवादी प्रदेश चिटणीस सुरेश गवस, राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष एम.डी. सावंत, तालुका उपाध्यक्ष बाबू परब, मालवण तालुका अध्यक्ष नाथा मालंडकर, वैभववाडी तालुका अध्यक्ष वैभव रावराणे, देवगड प्रांतिक सदस्य बाळा कोयंडे यांच्यासह शहरातील नागरिक, व्यापारी, विद्यार्थी, शिक्षक तसेच प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण आदी सहभागी झाले होते.

सामर्थ्य नवभारताचे तिरंगा यात्रा, देश मोंदीजीं के साथ है, हम सेना के साथ है, ऑपरेशन सिंदूर के साथ राष्ट्र असे फलक आणि तिरंगे झेंडे हातात घेवून यात्रेत सहभागी झालेल्यांकडून भारत माता की जय, वंदे मातरम, भारतीय सैन्यदलाचा विजय असो, अशा घोषणा देत ही यात्रा पटकीदेवीकडून बाजारपेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि तेथून तहसीलदार कार्यालयाकडे आली. तेथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत झाले. तिरंगा यात्रेच्या मार्गात ‘ऐ मेरे वतन के लोगो...’ हे गीत लावण्यात आले होते. एकूणच राष्ट्र आणि सैन्याप्रति अभिमान बाळगत काढण्यात आलेल्या या यात्रेने कणकवली शहरातील वातावरण तिरंगामय झाले होते.

भारतीय सैन्याचा आम्हाला सार्थ अभिमान- ना.नीतेश राणे

तिरंगा यात्रेची सांगता राष्ट्रगीताने झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री राणे म्हणाले, पहलगाम हल्लानंतर पाकिस्तानला भारताने चोख प्रत्युत्तर देत धडा शिकवला. आमच्या भारतीय सैन्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी आणि सैन्यदलाबद्दल अभिमान व्यक्त करण्यासाठी आज तिरंगा यात्रा काढण्यात आली. ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिम यशस्वी केली आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने पाकिस्तानला धडा शिकवला असून भारताची मान जगात उंचावल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

2014 पूर्वी दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचे धाडस दाखवले जात नव्हते; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देत त्यांची लायकी दाखवली आहे.
नीतेश राणे, पालकमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT