दोडामार्ग : तिलारी घाटात रस्ता दुतर्फा वाढलेल्या झाडांची साफसफाई करण्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. जेसीबीच्या सहाय्याने हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. घाटातील रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आलेल्या गडहिंग्लज प्रांताधिकाऱ्यांसमोर स्वराज्य सरपंच सेवा संघटना जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस व कोदाळीचे माजी सरपंच अंकुश गावडे यांनी हा मुद्दा प्रकर्षाने दाखवून दिल्याने साफसफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे.
तिलारी घाट एसटी सह वाहतुकीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान पावसाळ्यात रस्ता दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी झुडपे वाढली आहे. घाट रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी गडहिंग्लज प्रांताधिकाऱ्यांनी केली. तेंव्हा रस्त्यालगतच्या झाडी झुडपांमुळे तीव्र वळणांवर चालकाला समोरचे दिसत नसल्याचे चंदगड आगार व्यवस्थापक सतीश पाटील यांनी तेथे उपस्थित प्रवीण गवस, कोदाळी ता. चंदगडचे माजी सरपंच अंकुश गावडे, शिवसेनेचे मायकल लोबो, सामाजिक कार्यकर्ते राजू गावडे, दत्ताराम देसाई, पंकज देसाई व ग्रामस्थांना सांगितले होते.
रस्त्याची साफसफाई करणे ही सा. बां. ची जबाबदारी असून त्या अधिकाऱ्यांनी रस्त्यालगतची जाणूनबुजून साफसफाई केली नसल्याचे उपस्थितांनी प्रांताधिकाऱ्यांना सांगितले होते. घाटातून कायमस्वरूपी एसटी बंद करण्याचा घाट सा. बां. अधिकाऱ्यांचा असल्याचा आरोप करत घाटातून एसटी सुरू न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा प्रवीण गवस यांनी दिला होता. या नंतर सा. बां. चंदगड कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी घाटस्त्यालगत वाढलेली झाडे झुडपे जेसीबीच्या साह्याने साफ करण्याचे काम हाती घेतले.