तिलारी घाटात आढळलेली संशयास्पद दुचाकी  
सिंधुदुर्ग

Tilari ghat | तिलारी घाटात निर्जन ठिकाणी महिलेच्या मृतदेहापाठोपाठ आढळली बेवारस स्कूटर! प्रकरणाचे गूढ वाढले

काही दिवसांपूर्वीच सापडला होता महिलेचा मृतदेह, दोन्ही घटनांचा परस्पर संबध असण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग : तिलारी घाटातील निर्जन परिसरात ३० ते ३५ वर्षीय अनोळखी महिलेचा सडलेला मृतदेह आढळून आल्याच्या घटनेने निर्माण झालेली खळबळ अद्याप शांत झालेली नसतानाच आता घाटात एक संशयास्पद दुचाकी आढळून आली. यामुळे प्रकरणाला नवे आणि अधिक गूढ वळण मिळाले आहे. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसताना ही स्कूटर नेमकी कोणाची? ती घाटात कशी पोहोचली? आणि तिचा या घटनेशी काही संबंध आहे का? याबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

तिलारी घाटावरील वीज निर्मिती जलवाहिनीच्या प्रेशर पॉईंटकडे जाणाऱ्या आडरस्त्यालगत झाडी-झुडपात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असल्याने ओळख पटविणे कठीण झाले असून, घातपात करून मृतदेह येथे टाकण्यात आल्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.

दरम्यान, या घाटात संशयास्पदरीत्या एक स्कूटर आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. या दुचाकीचा मृत महिलेशी काही संबंध आहे का? ती घाटात आणून मुद्दाम सोडून देण्यात आली का? अथवा तपास दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे का? याबाबत चर्चा रंगू लागली आहे.

स्कूटरच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे मालकाचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे समजते. तिलारी घाट हा खोल दऱ्या, दाट जंगल आणि कमी वर्दळीमुळे पूर्वीपासूनच संवेदनशील मानला जातो. यापूर्वीही या परिसरात महिलांचे सांगाडे तसेच अन्य संशयास्पद मृतदेह आढळून आले आहेत. त्यामुळे मृतदेह सापडण्याची घटना आणि संशयास्पद दुचाकी यांचा परस्पर संबंध असल्यास हा केवळ अपघाती मृत्यू नसून नियोजनबद्ध गुन्ह्याचा भाग असू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिकांमध्येही या घटनेबाबत प्रचंड उत्सुकता आणि भीतीचे वातावरण आहे.

मृत महिलेच्या अंगावरील मोरपिसी रंगाची सोनेरी साडी, लाल-सोनेरी ब्लाऊज, पायातील पैंजण आणि जोडे या आधारे ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे, घाटात आढळलेल्या स्कूटरमुळे तपासाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तिलारी घाटातील या दुहेरी रहस्यामुळे संपूर्ण सीमाभागाचे लक्ष आता पोलिस तपासाकडे लागले आहे.

स्कूटरमुळे तपासाला नवी दिशा?

मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. अशा परिस्थितीत घटनास्थळाजवळ आढळलेली संशयास्पद स्कूटर तपासासाठी महत्त्वाचा धागा ठरू शकते. स्कूटरचा मालक, तिचा घाटाशी संबंध आणि ती तेथे किती दिवसांपासून होती? याचा उलगडा झाल्यास या गूढ मृत्यूमागील रहस्य उकलण्यास मदत होऊ शकते. मात्र अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे घाईचे ठरणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT