Konkan Costal Tourism Safety tips for tourist
सिंधुदुर्ग : गणेश जेठे
समुद्र तसा शांत कधीच नसतो; परंतु भरती आणि ओहोटी यामधील 45 मिनिटांचा काळ हा ‘स्लॅक वाटर’ म्हणून ओळखला जातो. याच काळात समुद्र बर्यापैकी ‘नॉर्मल’ स्थिती गाठतो. पर्यटकांसाठी ही स्लॅक वॉटरची 45 मिनिटे ही मज्जा लुटण्यासाठी पर्वणी ठरते. पण... इथेही मर्यादा ओलांडून चालणार नाही. समुद्र शांत दिसतो म्हणून त्याच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न झाला तर तो सहजपणे शिंगावरही घेतो, याचे भान पर्यटकांना असावे लागते.
चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे समुद्राला भरती येते आणि नंतर ओहोटीही लागते. जगातील समुद्र किनार्यांवरील भरती-ओहोटीचे वेळापत्रक अर्थातच बदलत असते. एवढेच कशाला एकट्या कोकण किनार्यावर सर्व ठिकाणी ते एकसारखे नाही. देवगड किनारा आणि वेंगुर्ले किनार्यामधील अंतर आहे 75 कि.मी. इतके. इथेही भरती आणि ओहोटीच्या वेळेत 15-20 मिनिटांचा फरक पडतो.
3 ऑक्टोबर रोजी शिरोडा-वेळागर येथील 7 जणांचे बळी घेणारी जी दुर्घटना घडली तेव्हा वेळ होती दुपारी 4 वाजताची. ओहोटीची ती वेळ होती. ज्या ‘रिप करंट’ने त्या पर्यटकांना दगा दिला तो ‘रिप करंट’ ओहोटीच्या वेळी अधिक ताकदवान असतो. त्यादिवशी शिरोडा-वेळागर येथे सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास भरती सुरू झाली होती. दुपारी 12 वाजता भरती जोरात होती. नंतर ओहोटी सुरू झाली. ती 5.30 वाजण्याच्या सुमारास संपली. तत्पूर्वीच त्या समुद्राने 7 जणांना पोटात घेतले होते.
भरती आणि ओहोटीचा काळ तसा 6 तासांचा असतो. भरती संपून ओहोटी सुरू होताना आणि ओहोटी संपून भरती सुरू होताना मधला जो 45 मिनिटांचा कालावधी असतो त्याला ‘स्लॅक वॉटर’ असे म्हणतात. या काळात तुलनेने समुद्र शांत असतो. या कालावधीत मात्र माणसाला समुद्रापासून धोका कमी असतो. ‘रिप करंट’ निर्मितीचे प्रमाण या काळात कमी असते; परंतु इथेही धोका पूर्णपणे नसतो असेही नाही. समुद्रात खोलवर जाणे टाळणे योग्यच.
सिंधुदुर्ग किनार्यावर हा ‘स्लॅक वॉटर’चा कालावधी साधारणतः सकाळी 6 वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी 6 वाजण्यापूर्वी असतो. मात्र जसा काळोख पडेल तसे समुद्र आपला स्वभाव बदलत जाईल याचे भान ठेवावे लागेल. देशातील समुद्र किनार्यावरील पर्यटकांची गर्दी सर्वात जास्त गोव्यात दिसते. संध्याकाळी साडेसहा वाजले की पोलिस स्पोर्ट कार घेऊन किनार्यावर फेरफटका मारतात आणि लाऊडस्पीकरवर पर्यटकांना किनारा सोडण्याचे आवाहन करतात. रात्री तर किनार्यावर पाण्याजवळ कुणाला फिरकूही देत नाहीत. म्हणूनच तर अपवाद वगळता पर्यटकांची मोठी गर्दी असूनही गोव्यात दुर्घटना कमी घडतात. तुलनेने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनार्यावर घडणार्या दुर्घटनांचे प्रमाण अधिक आहे. याचे कारण पर्यटकांना सतर्क करणारी यंत्रणा किनार्यावर उपलब्ध नाही. हीच शासकीय यंत्रणेची खरी जबाबदारी सिंधुदुर्गात पार पाडली गेली नाही.
सध्यातरी कोकण किनार्यावर भरतीच्या वेळी ज्या लाटा उसळतात त्यांची उंची साधारणतः अडीच मीटर म्हणजेच 7 फुटांपर्यंत आहे. जेव्हा अमावस्या-पौर्णिमा असते तेव्हा भरती अधिक तीव्र असते. या काळात भरतीच्या लाटांची उंची 2 फूट आणखी वाढते. त्यामुळे धोका वाढतो. पर्यटकांनी समुद्र पर्यटन करताना अमावस्या आणि पौर्णिमा कालावधीचा विचार करणे आवश्यक असते. या काळात समुद्र अधिक आक्रमक बनतो. परिणामी अंडरकरंट अधिक तीव्र असतो. शासकीय यंत्रणेने यावर बारकाईने अभ्यास करून समुद्रातील अंतर्गत हालचालींचे विश्लेषण करून त्याची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
‘लाईफ गार्ड’ हा दुसरा उपाय, परंतु जीवाला धोकाच होऊ नये यासाठी अगोदर उपाययोजना आवश्यक आहेत. समुद्र किनार्यावर त्यासाठी लाऊड स्पीकरवर पर्यटकांना आवाहन करणे, डिजिटल फलक उभारून भरती-ओहोटीची वेळ, स्लॅक वॉटर टाईम, लाटांची उंची याची माहिती पुरविणे आणि रिप करंटच्या संभाव्य जागा निश्चित करून त्या स्पॉटवर धोक्याचा इशारा देणे या उपाययोजना शासकीय यंत्रणेकडून करणे आवश्यक आहे.
पर्यटक आणि व्यावसायिक यांचे नाते घट्ट
पर्यटक आणि व्यावसायिक यांचे नाते घट्ट असावे आणि त्यासाठी शासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. बहुतांशी धोके हे पर्यटन व्यावसायिकांना माहीत असतात. समुद्र किनार्यावरील काही धोकादायक जागा निश्चित करून त्याचा इशारा देणारी यंत्रणा उपलब्ध करावी आणि महत्त्वाचे म्हणजे पर्यटकांना लाईफ जॅकेट उपलब्ध करावीत, अशी महत्त्वाची सूचना पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केली आहे.