आचरा : उदय बापर्डेकर
संस्थानकालीन आचरा गावाचा 'राजा' असलेल्या श्री देव रामेश्वराच्या त्रैवार्षिक डाळपस्वारीच्या उत्सवाला आज (रविवार) पासून शाही थाटात प्रारंभ झाला. मृदुंगाची थाप, सनई, ढोल, ताशा आणि तुतारीच्या मंजूळ स्वरांनी मंदिर व आजोबाजूच्या परिसराचे वातावरण पूर्णतः भक्तीमय बनले होते.
नगारखन्यातील चौघडयांच्या निनादातच... तोफा धडाडल्या.. बंदूकांच्या फैरीत आसमंतात उदळल्या आणि महालदारांनी दिलेल्या 'हर हर महादेव' च्या ललकारीत आसमंत दुमदुमून घेला. श्री देव रामेश्वराची एतिहासिक स्वारी शाही इतमामात संस्थानी थाटात भक्तांच्या भेटीला व रयतेची सुख दुःख जाणून घेण्यासाठी आपल्या शाही लवाजम्यासह बाहेर पडली. सर्वत्र श्री देव रामेश्वराच्या स्वगतासाठी ग्रामस्थांनी रस्त्यांवर सडासमार्जन करून जागोजागी पताका, रंगेबेरंगी गुढ्या, तोरणे चलचित्र देखावे, उभारली आहेत.
पुढील सात दिवस हा डाळपस्वारी उत्सव चालणार असून या कालावधीत श्री देव रामेश्वर गावातील सर्व घरांमधील बारावाड्यांतील उपदेवस्थानच्या गाटीभेटी घेवून समस्त रयतेची सुखदु:खे जाणून घेणार आहेत. 7 फेब्रुवारीला डाळपस्वारी श्री देव रामेश्वर मंदिरात परतल्यानंतर या उत्सवाची सागता होणार आहे.
मंदिरातून बाहेर पडल्यानंतर रविवारी सकाळी पास्थळामधील देवदेवतांच्या भेटी घेवून श्री देव रामेश्वराची स्वारी रवाळनाथ मंदिराजवळुन नगारखाण्यात चौघड्याची इशारत होताच स्वारी रामेश्वर घाटीपर्यत वायुवेगाने धावत गेली. यावेळी वातावरण जोशपूर्ण बनले होते. तेथून ही स्वारी छञ चामरे, अब्दागिर, भगवे बावटे, महालदार, चोपदारांसह, निशाण संस्थानी आब राखत भक्तांच्या ओट्या स्वीकारत आचरा बाजारपेठमार्गे श्री देवी फुरसाई मंदिराकडे रवाना झाली.
रस्त्यावर शेणाने सारवण करून सडारांगोळी काढून धूप दीप लावून गुढ्या तोरणे उभारून प्रत्येक भाविक 'श्रीं' च्या स्वगतासाठी सूर्याच्या रखरखीत उन्हातही भाविक हजारोंच्या संख्येने या सोहळ्यात सामील झाले होते.
भाविकांसाठी आचरा येथील मुबंईस्थित वास्तूशास्त्रज्ञ मधुकर लाड यांनी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच मिराशीवाडी मित्र मंडळाकडून शिरा व शितपेयांचे वाटप करण्यात आले.
संध्याकाळी मिराशीवाडीमार्गे नागजरी येथील गिरावळीच्या मंदिरात ' श्रीं 'ची स्वारी विसावली. सोमवारी विश्रांती दिवस असल्याने श्रीं ची स्वारी तेथेच थाबणार आहे. मंगळवारी दुपारी गिरावळी मंदिरात नारळांची रास पोटाळून बौध्दवाडी, महास्थळमार्गे देव ब्राम्हणमंदिर गाऊडवाडी येथे मुक्काम करणार आहेत.
सकाळी भक्तांच्या भेटीगाठी घेत श्री ब्राम्हणमंदिर गाऊडवाडी येथून जामडूल - पिरावाडी चव्हाटामार्गे हिर्लेवाडी श्री देव ब्राम्हण मंदिरामध्ये रात्री उशीरा थांबून पहाटे पुन्हा गिरावळी मंदिरात विश्रांतीसाठी स्वारी पोहोचणार आहे. शुक्रवार दि.7 फेब्रुवारी रोजी गिरावळी मंदिरातून स्वारी आचरा बाजारपेठमार्गे श्री देव ब्राम्हणमंदिर नागोचीवाडी श्री देव ब्राम्हणमंदिर पारवाडी येथे रात्री थांबणार आहे. तिथे सर्वभाविकांना पारवाडी मिञमंडळातर्फे महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. तेथून रात्री उशिरा निघून पहाटे श्री देव रामेश्वर मंदिर येथे आगमन होणार आहे.
आचरा ग्रामपंचायती कडून भाविकांना मोफत टोप्यांचे वाटप करण्यात आले. श्रीं च्या डाळपस्वारीला येणाऱ्या सर्व भक्तांना ग्रामपंचायत आचराचे सरपंच जेरॉन फार्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, सदस्य महेंद्र घाडी, पंकज आचरेकर तसेच इतर सदस्यांकडून समस्त आचरेवासियांना उन्हापासून संरक्षण होण्यासाठी मोफत टोप्यांचे वाटप करण्यात आले होते.