कणकवली ः एसटी बस स्थानकासमोर चक्काजाम आंदोलन करताना ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते. pudhari photo
सिंधुदुर्ग

कणकवली बसस्थानकात ठाकरे शिवसेनेचा चक्काजाम

Public Transport Disruption: तिकीट दरवाढी विरोधात घोषणा देत सरकारचा केला निषेध

पुढारी वृत्तसेवा

कणकवली ः एसटी तिकीट दरवाढी विरोधात गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमख सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली कणकवली बसस्थानकात चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले. यावेळी अर्धा तास एसटी बसेस रोखून धरण्यात आल्या. बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना याचा त्रास होऊ नये याकरता प्रवाशांना पाण्याच्या बॉटल्स वाटण्यात आल्या. दरवाढीच्या निषेधाचे फलक झळकवत सरकारचाही निषेध करण्यात आला.

राज्य शासनाने अलिकडेच एसटी तिकीट दरात 15 टक्के वाढ केली आहे. त्याचा राज्यभर ठाकरे शिवसेनेकडून निषेध करत आंदोलने केली जात आहेत. गुरुवारी कणकवली बसस्थानकात हे आंदोलन करण्यात आले. एसटी तिकीट दरवाढ करणार्‍या सरकारचा निषेध असो! गोरगरीब जनतेची लूट करणार्‍या सरकारचा निषेध असो! या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय! महायुती सरकारचा निषेध असो! अशा घोषणा देऊन शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, महेश कोदे, सचिन सावंत, आबू मेस्त्री, प्रसाद अंधारी, राजू राठोड, उत्तम लोके, वैदेही गुडेकर, तात्या निकम, तेजस राणे, आदित्य सापळे, दिव्या साळगावकर, धनश्री मेस्त्री, हेलम कांबळी, गुरुनाथ पेडणेकर, बाळा राऊत, विलास गुडेकर आदी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

जिल्हाप्रमुख संदेश पारकर म्हणाले, दरवाढीचा जाहीर निषेध आम्ही करत आहोत. एसटीच्या जुन्या गाड्यातून लोकांना प्रवास करावा लागत असून एसटी गाड्या वेळेत सोडल्या जात नाहीत. लोकांना एसटी महामंडळाकडून चांगल्या सुविधा दिल्या जात नाहीत, मात्र दरवाढ जनतेच्या माथी मारली जात आहे. महायुती सरकारने याचा फेरनिर्णय घेऊन दरवाढ तात्काळ रद्द करावी. अन्यथा यापुढे यापेक्षाही मोठे आंदोलन करू, असा इशारा संदेश पारकर यांनी दिला.

सतीश सावंत म्हणाले, एसटीची भाडेवाढ करून उत्पन्न मिळविणे एवढाच कार्यक्रम महायुती सरकार राबवत आहे. एकीकडे ग्रामीण भागातील एसटी सेवा कोलमडली आहे. शालेय फेर्‍यांमध्ये देखील दिरंगाई होत आहे, दुसरीकडे तिकीट दरवाढ करण्यात आली हे निषेधार्ह आहे. त्यामुळे विभागीय वाहतूक अधिकार्‍यांशी चर्चा करून एसटी सेवा सुधारण्याबाबत विभागनियंत्रकांनी 4 दिवसात बैठक घ्यावी अशी सूचना आम्ही केली आहे. सिंधुदुर्गसाठी नवीन एसटी गाड्या द्याव्यात अशी मागणी देखील श्री. सावंत यांनी केली.

प्रवाशांना उद्भवणार्‍या समस्यांचा वाचला पाढा

विभागीय वाहतूक अधीक्षक नीलेश लाड यांच्याशी चर्चा करताना प्रवाशांना उद्भवणार्‍या समस्यांचा पाढा वाचण्यात आला. कणकवली बसस्थानकातील स्वच्छतागृह अस्वच्छ झाले असून त्याची तातडीने स्वच्छता करा. जुन्या गाड्यातून प्रवासी वाहतूक थांबवा. शालेय फेर्‍या वेळेत सोडा. बंद झालेल्या फेर्‍या पुन्हा सुरू करा, अशा सूचना करण्यात आल्या. दरवाढ रद्द करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. आंदोलनातील मागण्या वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्याची ग्वाही यावेळी श्री. लाड यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT