वीज अधिकार्‍यांना जाब विचारताना ठाकरे शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते. (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Smart Meter Protest | अन्यथा स्मार्ट मीटर ‘मशाली’ने जाळून टाकू!

Thackeray Shiv Sena Warning | ठाकरे शिवसेनेचा वैभववाडीतील वीज अभियंत्यांना इशारा

पुढारी वृत्तसेवा

वैभववाडी : वैभववाडी तालुक्यात महावितरणने बसविलेले स्मार्ट मीटर तात्काळ काढण्यात यावेत. अन्यथा हे स्मार्ट मीटर ‘मशाली’ने जाळून टाकू, असा इशारा देत ठाकरे शिवसेनेच्या वतीने महावितरणच्या अधिकार्‍यांना बुधवारी सकाळी 11 वा. घेरावा घालण्यात आला. मोठया संख्येने सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान ग्राहकांच्या संमती शिवाय आम्ही स्मार्ट मिटर बसविणार नाही. तसेच तालुक्यातील वीज समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन, महावितरणच्या अभियंत्यांनी दिलेे.

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके या प्रकरणी चांगलेच आक्रमक झाले. महावितरणच्या अधिकार्‍यांना घेरावा घालत जाब विचारला. ग्राहकांची परवानगी न घेता हे स्मार्ट मीटर बसविण्यात येतात. या मीटरचे बिल जुन्या मीटर पेक्षा चारपट येत आहे. यामुळे जनतेची पिळवणूक होत आहे. त्यासाठी जे स्मार्ट मीटर लावण्यात आलेले आहेत ते तात्काळ काढून त्याजागी जुनेच मीटर बसवण्यात यावेत. ज्या ग्राहकांची मीटर बदलण्याची मागणी असेल त्यांचेच मीटर नवीन बसवण्यात यावेत.

गेले 3 ते 4 महिने काही नागरिकांना वीज बिल मिळालेले नाही. ते बिल भरण्यासाठी नागरिकांना मुदत वाढ द्यावी, वीज बील भरले नाही म्हणून कोणत्याही ग्राहकांची वीज पुरवठा खंडित करू नये. अशी मागणी ठाकरे शिवसेनच्या वतीने करण्यात आली. जर कोणी हे मीटर जबरदस्ती बसविण्याच्या प्रयत्न करत असतील तर नागरिकांनी शिवसेनेच्या कार्यायलाशी संपर्क साधावा, असे आवाहन सुशांत नाईक यांनी केले.

वैभववाडीचे माजी सभापती लक्ष्मण रावराणे, अल्पसंख्यांक सेल तालुका प्रमुख जावेद पाटणकर, विभाग प्रमुख जितू तळेकर, यशवंत गवाणक, युवासेना तालुका प्रमुख रोहित पावसकर, गुलजार काझी, सूर्यकांत परब, अनिल नराम, दीपक पवार, विलास पावसकर, राजेश तावडे, प्रमोद लोके, नीतेश शेलार, ओमकार इस्वलकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री लक्ष घालणार की नाही?

पालकमंत्र्यांनी अदानी कंपनी प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन यावर विचार करायला हवा. स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना पडत असलेला भुर्दंड यावर पालकांमंत्री लक्ष देणार का? असा प्रश्न सुशांत नाईक यांनी केला. हे स्मार्ट मीटर बसविण्यासाठी महावितरण सक्ती करत असेल तर जन आक्रोश मोर्चा काढू. जबरदस्ती स्मार्ट मिटर बसवल्यास, तुमची शिवसेनेशी गाठ आहे असा इशारा सुशांत नाईक यांनी दिला..

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT