Thackeray Shiv Sena Protest
कुडाळ: मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. या कामाच्या दिरंगाईस केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी जबाबदार असल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला. महामार्गावरील अपूर्ण व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना त्रास होऊ नये, तसेच सरकारला जाग आणण्यासाठी १३ ऑगस्ट रोजी कुडाळ तालुक्यातील हुमरमळा येथे सकाळी ११ वाजता चक्का जाम आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नाईक यांनी सांगितले की, महामार्गाचे काम गेल्या ११ वर्षांपासून रखडले आहे. वारंवार ठेकेदार बदलले गेले, अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाले, परिणामी महामार्गावर मोठे खड्डे पडले आहेत आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मागील गणेशोत्सवात महामार्ग पूर्ण होईल, असे सांगितले होते. मात्र, दुसरा गणेशोत्सव येऊनही काम पूर्ण झालेले नाही. पुढील एक वर्षही महामार्ग पूर्ण होणार नाही, अशी स्थिती आहे. या प्रकरणी सिंधुदुर्ग शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख संदेश पारकर, माजी आमदार परशुराम उपरकर, सतीश सावंत, युवक नेते मंदार शिरसाट आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील व्यापारी, वाहतूकदार, नागरिक यांना महामार्गाच्या दुरवस्थेमुळे मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यामुळे सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सांगितले की, राज्यात सरकार आणि मंत्री बदलले, पण महामार्गाचे काम काहीच पुढे सरकले नाही. ठेकेदारांना दरवर्षी पैसे दिले जातात, पण खड्डे भरले जात नाहीत, ही शोकांतिका आहे.
जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी सांगितले की, मागील आंदोलनामुळे टोल वसुली थांबवण्यात आली होती, त्यामुळे जनतेचे कोट्यवधी रुपये वाचले. मात्र, महामार्गाच्या दुरवस्थेमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
सतीश सावंत यांनी सांगितले की, महामार्गाच्या निकृष्ट कामाचा निषेध म्हणून हे आंदोलन आहे. प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्यास गणेशोत्सवानंतर आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निरीक्षक बाळ माने यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख पदावरुन वरून झालेल्या वादाबाबत विचारले असता, तो वाद त्या दिवशी पुरताच होता, उद्याच्या आंदोलनाला बाबुराव धुरी उपस्थित राहणार आहेत, हा जनतेचा प्रश्न आहे. त्यामुळे या आंदोलनात जिल्हा वासियांसह सर्व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा विश्वास माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, सतीश सावंत यांनी व्यक्त केला.