सावंतवाडी ः भारतीय रेल्वेने तत्काळ तिकीट आरक्षणातील गैरप्रकार रोखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता लवकरच तत्काळ तिकीट बुकिंगसाठी ई-आधार पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यामुळे सामान्य प्रवाशांना गरज असताना कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, ज्या प्रवाशांचे ओळखपत्र आधार कार्डशी जोडलेले असेल, त्यांना तत्काळ तिकीट बुकिंगच्या सुरुवातीच्या 10 मिनिटांत प्राधान्य दिले जाईल. सध्या, आयआरसीटीसीच्या अधिकृत एजंटनाही तत्काळ विंडो सुरू झाल्यावर पहिल्या 10 मिनिटांपर्यंत तिकीट बुक करण्याची परवानगी नसते. त्यामुळे ज्या प्रवाशांचे खाते आधार लिंक असेल, त्यांना तिकीट बुक करणे अधिक सोपे जाईल.
रेल्वे मंत्रालयाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन माध्यमातून स्वयंचलित सॉफ्टवेअर वापरून तिकीट बुकिंग करणार्या एजंट्सविरुद्ध रेल्वेने कठोर कारवाई सुरू केली आहे. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (ईींळषळलळरश्र खपींशश्रश्रळसशपलश) आधारित तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. नुकत्याच झालेल्या खात्यांच्या तपासणीत 20 लाख संशयास्पद खाती आढळली असून, त्यांची आधार आणि इतर कागदपत्रे तपासली जात आहेत. सध्या आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर 13 कोटींपेक्षा जास्त सक्रिय ग्राहक आहेत, ज्यापैकी 1.2 कोटी खाती आधारशी जोडलेली आहेत. आता आयआरसीटीसीने आधारशी जोडणी न केलेल्या उर्वरित 11 कोटी 80 लाख खात्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यांची कसून चौकशी करून संशयास्पद खाती ब्लॉक केली जाणार आहेत. रेल्वेचा उद्देश हा आहे की, तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ सेवेअंतर्गत केवळ अधिकृत प्रवाशांनाच तिकीट उपलब्ध व्हावे. त्यामुळे ज्या खातेधारकांनी आपले खाते आधारशी लिंक केले आहे, त्यांना तत्काळ बुकिंगच्या पहिल्या 10 मिनिटांत निश्चितच फायदा होणार आहे.