मालवण ः मालवण-तारकर्ली येथे पुणे- हडपसर येथून पर्यटनासाठी आलेल्या दोन युवकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला, तर एकाला वाचविण्यात यश आले. यातील गंभीर असलेल्या युवकावर मालवण शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना शनिवारी सकाळी 11.20 वा. दरम्यान तारकर्ली - रांजेश्वर मंदिर एमटीडीसीजवळ समुद्रात घडली.
पुणे-हडपसर येथील कुश संतोष गदरे (वय 21), रोहन रामदास डोंबाळे (20), ओंकार अशोक भोसले (26), रोहित बाळासाहेब कोळी (21), शुभम सुनील सोनवणे (22) हे पाच युवक दोनदिवसांपूर्वी तारकर्ली येथे पर्यटनासाठी आले होते. शनिवारी सकाळी ते तारकर्ली येथील पर्यटन विकास महामंडळ कार्यालगत समुद्रात स्नानासाठी उतरले होते.
दरम्यान, त्यांना पाण्याच्या खोलीचा व लाटांचा अंदाज न आल्यामुळे ओंकार भोसले, रोहित कोळी, शुभम सोनवणे हे तिघे युवक खोल समुद्रात ओढले गेले. हे तरूण बुडत असल्याचे पाहून त्यांच्या सहकार्यांनी ओरडण्यास सुरुवात केली. किनार्यावरील स्थानिक नागरिक आणि व्यवसायिकांनी तत्काळ बचाव कार्य सुरू केले. बोटीच्या सहायाने या युवकांचा समुद्रात शोध घेण्यात आला. शोध सुरू असताना बुडालेल्या अवस्थेत हे तीनही युवक सापडले. त्यांना तत्काळ किनार्यावर आणत रुग्णवाहिकेतून मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वैद्यकीय अधिकार्यांनी यातील रोहित कोळी व शुभम सोनवणे यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. तर ओंकार भोसले हा अत्यवस्थ असून अधिक उपचारासाठी त्याला मालवणातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बचाव कार्यात समीर गोवेकर, वैभव सावंत, दत्तराज चव्हाण, महेंद्र चव्हाण, राजेश्वर वॉटर स्पोर्ट्सचे कर्मचारी सहभागी झाले होते. या युवकांपैकी काहीजण फार्मसीचे शिक्षण घेत आहेत तर काहीजण महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत.