आ. नितेश राणे  file photo
सिंधुदुर्ग

विजयदुर्ग-तळेरे रस्ता विकासाचा राजमार्ग ठरेल : आ. नितेश राणे

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : विरोधी पक्षाकडे पार्टी फंड नसल्यामुळे त्यांची आंदोलने हल्ली वाढलेली आहेत आणि त्यामुळेच विकास कामांना विरोध वाढला आहे. काहींचा तर उदरनिर्वाह हीच विकास कामे अडवून चालतो; मात्र असला विरोध यापुढे खपवून घेतला जाणार नाही, अशा शब्दात आ. नितेश राणे यांनी विरोधकांना सुनावले.

४१७ कोटींचा निधी मंजूर 

तळेरे- विजयदुर्ग हा राज्यमार्ग पुढील ५० वर्षांच्या विकासाचा राजमार्ग ठरेल असा विश्वास आ. नितेश राणे यांनी व्यक्त केला. विजयदुर्ग-पडेल-वाघोटन- तळेरे या राज्यमार्गाच्या रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ४१७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी कासार्डे तिठा येथे आ. नितेश राणे यांच्या हस्ते व मुंबईत सार्वजनिक बांधकामच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.

यावेळी माजी आमदार अजित गोगटे, तुळशीदास रावराणे, बाळ खडपे, राजन चिके, मनोज रावराणे, संतोष कानडे, संदीप साटम, कणकवली भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, देवगड तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष श्री. नकाशे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड व त्यांचे अभियंता, भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी स्थानिक सरपंच उपसरपंच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. राणे म्हणाले, कणकवली व देवगड तालुक्यातील विजयदुर्ग तळेरे रस्ता हा दर्जेदार करण्याची सर्व जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वीकारलेली आहे.

होणारी विकास कामे म्हणजे दिवाळी आधीची दिवाळी

ही होणारी विकास कामे म्हणजे दिवाळी आधीची दिवाळी आहे. रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि या रस्त्यांवरून जाताना जो त्रास होतो याची दखल घेऊन या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळवली. यासाठी अथक प्रयत्न करावे लागले. हा रस्ता होत असताना सर्वांनी सहकार्य आणि एकमेकांना मदत करून रस्ता लवकरात लवकर पूर्णत्वास कसा केला जाईल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्या त्या भागातील सरपंचांनी योग्य ती खबरदारी घेऊन रस्ता करणाऱ्या ठेकेदारांना सहकार्य करावे.

रस्त्याचे काम दर्जेदार व्हायला हवे यावर आपला कटाक्ष राहिल. तळेरे- विजयदुर्ग रस्त्यामुळे फार मोठा विकासात्मक बदल येत्या ५० वर्षांत होणार आहे आणि तो सर्वांच्याच फायद्याचा ठरेल असा विश्वास यावेळी आ. नितेश राणे यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी या रस्त्याच्या कामासाठी मेहनत घेणाऱ्या कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचे कौतुक केले. तसेच या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शासनाचे आभार मानले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT