Security Guard Death 
सिंधुदुर्ग

Security Guard Death | दोडामर्ग तालुक्यातील वझिरे येथील आंगण प्रकल्पात सुरक्षा रक्षकाचा संशयास्पद मृत्यू

Security Guard Death | नातेवाईक व ग्रामस्थ आक्रमक; आर्थिक मदतीचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

दोडामर्ग : पुढारी वृत्तसेवा
वझिरे येथील आंगण गृहप्रकल्पात सुरक्षाक्षक असलेले मोहन वासुदेव गस (६२) यांचा संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी स. ८ वा. सुमारास उघडकीस आली. कंपनी व्यवस्थापनाने मोहन गस यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेला यावरून घटनास्थळी मोठा वाद झाला. कंपनीच्या बांधकाम आणि सुरक्षा व्यवस्थापकाला फैलावर घेण्यात आले, आम्हाला न कळविता मृतदेह रुग्णालयात नेला?

कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प असताना तुम्ही सीसीटीव्ही बंद आहे हे सांगता, हे पटत नाही, आम्हाला तात्काळ फुटेज व रजिस्टर दाखवा, अशी मागणी नातेवाईकांनी केली. हा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांचा घातपात झाला आहे, त्यामुळे त्यांच्या मृत्यूस कारणीभूत कंपनी आणि सुरक्षा व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करा अशी मागणी नातेवाईकांनी केली.

वझिरे येथे आंगण व्हीला (बंगले) प्रकल्प उभारण्यात येत आहे. जवळपास या प्रकल्पाचे काम पूर्ण होत आले आहे, या प्रकल्पात कसई येथील मोहन गस हे गेल्या तीन वर्षांपासून सुरक्षाक्षक म्हणून कार्यरत होते. बुधवारी ते रात्रीच्या ड्युटीला हजर झाले, रात्री १२.३२ वा. त्यांनी सिक्युरिटी व्हॉट्सअप ग्रुप वर गेटवर उभा राहून फोटो काढत तो अपलोड केला.

गुरुवारी सकाळी वाळूची गाडी गेटवर आली असता सुरक्षा रक्षक गेट उघडण्यास आले नसल्याने चालकाने व्यवस्थापकाला कॉल करून माहिती दिली. त्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. मोहन गस निपतचित पडलेले दिसून आले. व्यवस्थापनाने अन्य कामगारांच्या सहाय्याने रुग्णवाहिका बोलावून मृतदेह नातेवाईकांना, पोलिसांना न कळविता रुग्णालयात दाखल केला.

पोलिसांना रुग्णालयातून कॉल करून घटनेची माहिती देण्यात आली. नंतर पोलीस, नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले. येथे नातेवाईकांनी मृतदेह पाहिला असता छातीच्या उजव्या बाजूला काळपट भाग झालेला दिसला, तसेच मानेच्या खाली जखम तसेच उजव्या पायाच्या बोटात रक्तस्राव दिसून आला. यामुळे ही घटना गंभीर असताना कंपनी व्यवस्थापनाने मृतदेह रुग्णालयात नेलाच कसा? हा घातपात आहे, असा आमचा आरोप आहे, त्यामुळे कंपनी आणि सुरक्षा व्यवस्थापक या दोघांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी नातेवाईक, ग्रामस्थ यांनी केली.

दु. २ वा. दरम्यान कंपनी गेटवर आलेले बांधकाम, सुरक्षा व्यवस्थापक यांना ग्रामस्थांनी चांगले फैलावर घेतले, एवढा मोठा कोट्यवधीचा प्रकल्प आणि तुम्ही थातुर मातुर उत्तर देता. आम्हाला आत्ता सीसीटीव्ही फुटेज व नोंदवही दाखवा, अशी मागणी केली. उपस्थित पोलिसांनी मध्यस्थी करत वेळी वाद मिटवला. मात्र ग्रामस्थ आपल्या मागण्यांवर ठाम राहिले.

ग्रामस्थांनी कंपनी व्यवस्थापक आणि सुरक्षा व्यवस्थापक या दोघांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी डीवायएसपी राजेश भागवत, पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या समक्ष केली.
मृत मोहन गस यांनी बुधवारी रात्री कामाला जाताना २ किलो चिकन सोबत नेले होते, अशी माहिती चिकन विक्रेत्याने घटना स्थळी दिली.

यामुळे बुधवारी रात्री आंगण प्रकल्पात पार्टी झाली का? त्या पार्टीत काय वाद झाला का? यासाठी त्या रात्री कामावर हजर सर्व कामगारांची कसून चौकशी करण्याची तसेच काही कामगार या प्रकरणा नंतर गायब झाले आहेत, त्यांचा शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. कंपनी व्यवस्थापनाकडून मृताच्या नातेवाईकांना मदत म्हणून १० लाख रुपये जाहीर केले अशी माहिती प्रा. संदीप गस यांनी दिली.
या घटनेबाबत पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांना विचारले असता ते म्हणाले की हा घातपात असल्याचा संशय दिसत नसून मृतदेह विच्छेदनासाठी सिंधुदुर्ग नगरी येथे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यावर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT